भारतीय जवानांना मारा, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 04:50 PM2017-12-28T16:50:49+5:302017-12-28T16:51:32+5:30
जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत यावर्षी भारतीय जवानांनी 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करी अधिकार्यांना ठार मारण्याचे आदेश पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिला आहे.
निम-लष्करी जवानांना आणि भारतीय जवानांना मुख्यत: पहिल्यांदा लक्ष करण्याच्या सुचना पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिल्या आहेत. भारतीय जवानांना लक्ष केल्यास नियंत्रण रेषा ओलांडता येईल हा त्यामागील उद्देश आहे. भारतीय जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करण्याचे आदेश पाकिस्तानडून देण्यात आल्याचे वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे.
ताज्या रिपोर्टनुसार 49 दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. उरी, नौगम, नौशेरा आणि पुंछ या भागामधून जास्तीत दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. गुरेझ, मचल, केरन, तांगधर आणि रामपूर ही ठीकाणं दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.
काल पाकिस्तानमधील अल-कायदा या अतिरेकी संघटनेने एक व्हिडिओ व्हायरल करून भारताविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी अतिरेक्यांना डिवचलं आहे. काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ला करा,' अशी चिथावणीच अल-कायदानं अतिरेक्यांना दिली आहे. जिहादी फोरम या ऑनलाइन साइटवर अलकायदाकडून भारताविरोधी व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. अलकायदाचा एक प्रमुख नेता उसामा महमूद याने हा भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ जारी केला आहे. काश्मीरवर वर्चस्व ठेवण्यासाठी भारत काश्मिरात ६ लाख सैनिकांचा वापर करत आहे. अशा वेळी कोलकाता, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतातील बड्या आणि महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केल्यास भारताचं लक्ष काश्मीरवरून विचलीत होईल. त्यांचं काश्मीरवरचं वर्चस्व कमी होईल आणि आपल्याला काश्मिरात मजबूत संघटन उभारता येईल, असं उसामाने या व्हिडिओत म्हटलं आहे.