भारतीय जवान आता मार्शल आर्टने शत्रूला लोळवणार; इस्रायलीसह जपानी आईकिडोचही प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:19 AM2022-11-03T08:19:27+5:302022-11-03T08:20:02+5:30
आयटीबीपीच्या जवानांना बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण आधीपासूनच देण्यात येत होते.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांना आता इस्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या जवानांना शत्रूशी अधिक समर्थपणे मुकाबला करता येणार आहे. आयटीबीपीच्या जवानांना बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण आधीपासूनच देण्यात येत होते. त्यात आता काही नव्या गोष्टींची भर पडली आहे. एखादा जवान शस्त्रहीन असला तरी तो या प्रशिक्षणाच्या बळावर शत्रूला नामोहरम करू शकतो. (वृत्तसंस्था)
१५-२० हजार जवान जपानी आईकिडोमध्ये तरबेज आहे. जपानी आईकिडो या मार्शल आर्टचा आता समावेश करण्यात आला आहे.
२४आठवड्यांचे प्रशिक्षण आयटीबीपीच्या जवानांना दिले जाते. त्यात इयामा रियू, शिन शिन आईकी, शुरेन काई शोडोकान आइकिदो, योशिकान, रेशनिनकाई, आदी स्टाइल व डावपेचांचाही समावेश आहे. आयटीबीपीने पंचकुला येथे आपल्या १५ ते २० हजार जवानांना नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इस्रायली मार्शल आर्ट व जपानी आईकिडो या मार्शल आर्टमध्ये तरबेज केले आहे.
भावी संघर्षात बाजी जिंकण्यासाठी पूर्वतयारी
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत व चीनचे सैनिक गस्त घालत असतात. या जवानांनी एकमेकांवर गोळीबार करू नये, असे दोन्ही देशांनी ठरविले आहे. मात्र त्यानंतरही अनेकदा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो. भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाले होते. असाच संघर्ष भविष्यात उद्भवला तर विविध प्रकारच्या मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतलेले भारतीय जवान चीनच्या सैनिकांचा आणखी उत्तम प्रकारे मुकाबला करू शकतील, असे सांगण्यात आले.