दिलासादायक! ओमायक्रॉनवर भारतातील उपचार पद्धत प्रभावी; 358 संक्रमितांपैकी 114 रिकव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:17 PM2021-12-24T18:17:54+5:302021-12-24T18:30:06+5:30
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी ओमायक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली.
नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, पण कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. पण, आता एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत देशात ओमिक्रॉनची 358 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, पण त्यापैकी 114 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
पॉझिटिव्हिटी दर कमी
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ओमायक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, ओमायक्रॉनचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील जगभरातील सरासरीपेक्षा कमी आहे. इतर देशातील पॉझिटिव्ह रेट 6% पेक्षा जास्त आहे. भारताचा पॉझिटिव्ह 5.3% आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये भारताचा पॉझिटिव्ह रेट फक्त 0.6% राहिला आहे.
भारताची उपचार पद्धत प्रभावी
राजेश भूषण पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या वेळी राबवलेल्या उपचार पद्धती ओमायक्रॉनवरदेखील प्रभावी असल्याचे पुरावे आहेत. दरम्यान, केरळ आणि मिझोराममधील प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणाले की, सध्या देशात 20 जिल्हे आहेत, ज्यात केस पॉझिटिव्ह रेट 5 ते 10% च्या दरम्यान आहे. यापैकी 9 केरळमध्ये आणि 8 जिल्हे मिझोराममध्ये आहेत. देशातील फक्त 2 जिल्ह्यांमध्ये केस पॉझिटिव्ह दर 10% पेक्षा जास्त आहे आणि हे दोन्ही जिल्हे मिझोराममध्ये आहेत.
इतर देशात रुग्णांमध्ये वाढ
यावेळी भूषण यांनी ओमायक्रॉनच्या सध्याच्या परिस्थितीवरही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत जगातील 108 देशांमध्ये 1,51,000 हून अधिक ओमायक्रॉनची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. जगात कोरोनाची चौथी लाट पाहायला मिळत आहे, म्हणूनच आपण सावध असले पाहिजे.
ख्रिसमस आणि 31 डिसेंबरमुळे बाजारपेठेत वाढ झाली आहे. लोक मास्क न घालता, सामाजिक अंतर न पाळता खरेदीत व्यस्त आहेत, असला हलगर्जीपणा टाळावा. तर, भारतात शुक्रवारी सकाळपर्यंत 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 358 ओमिक्रॉन रुग्ण आढळले असून, त्यातील 114 रुग्ण ठीक झाले आहेत.
89 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला
आरोग्य सचिव पुढे म्हणाले, आज आमच्याकडे 18,10,083 आयसोलेशन बेड, 4,94,314 ऑक्सिजन सपोर्टेड बेड, 1,39,300 ICU बेड, 24,057 बालरोग ICU बेड आणि 64,796 बालरोगतज्ञ नॉन-ICU बेड्स राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहेत. सध्या देशभरात 89 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि पात्र लोकसंख्येपैकी 61 टक्के लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.
राज्यांना रात्री कर्फ्यू लागू करण्याचा सल्ला
राजेश भूषण म्हणाले, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 21 डिसेंबर रोजी राज्यांना रात्री कर्फ्यू, मोठ्या मेळाव्यावर नियंत्रण ठेवण्यासारखे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. बेड आणि इतर लॉजिस्टिकची क्षमता वाढवली पाहिजे आणि कोविडसाठी योग्य पद्धतींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. डीजी-आयसीएमआर डॉ बलराम भार्गव म्हणाले, अलीकडेच ओळखल्या गेलेल्या क्लस्टर्ससह, डेल्टा प्रकार भारतात अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे, कोरोनाचे नियम आणि लसीकरण वाढवण्यासाठी आपल्याला अशीच रणनीती आखण्याची गरज आहे.
केंद्राने बूस्टर शॉटसाठी सुरू केला अभ्यास
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बूस्टर डोसची मागणी जोर धरत आहे. यातच आता केंद्र सरकारने देशातील 3 हजार लोकांवर बूस्टर डोसच्या चाचण्या घेण्याचे ठरवले आहे. या चाचणीच्या निकालावर बूस्टर डोसची गरज ठरवली जाईल. केंद्र सरकारने बूस्टर डोसची अत्यावश्यकता शोधण्यासाठी एक अभ्यास सुरू केला आहे, ज्यामध्ये सहा महिन्यांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेतलेल्या लोकांचा समावेश असेल.
हा अभ्यास बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) द्वारे केला जात आहे. यामध्ये Covishield, Covaccine आणि Sputnik V लसींचा समावेश असेल. अभ्यासासाठी दिल्ली-एनसीआर, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथून नमुने घेतले जातील.