सोशल मीडियावर 70 टक्के वेळ घालवतात भारतीय युजर्स- रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 11:30 AM2017-12-19T11:30:18+5:302017-12-19T11:33:58+5:30
सोशल मीडियाचा सगळीकडेच वारेमाप वापर केला जातो आहे.
नवी दिल्ली- सोशल मीडियाचा सगळीकडेच वारेमाप वापर केला जातो आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय लोक जेव्हा मोबाइल वापरतात तेव्हा ते सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा वापर करतात किंवा गाणी ऐकतात तसंच सिनेमेही बघतात. आकडेवारीनुसार, भारतातील मोबाइल युजर्स मोबाइल वापराचा 70 टक्के वेळ फेसबुक, व्हॉट्सअॅप, गाणी आणि एन्टरटेंन्मेंट अॅप्लिकेशनच्या वापरावर खर्ची करतात. दुसरीकडे अमेरिकेतील मोबाइल युजर्स या अॅप्सच्या मागे 50 टक्के वेळ घालवतात. ओमिडयार नेटवर्कने हा रिपोर्ट जाहीर केला आहे. रिपोर्टनुसार अमेरिकेतील मोबाइल युजर्स त्यांचा जास्त वेळ बातम्या, कॉमर्शिअल साइट व गेम खेळण्यात घालवतात.
ओमिडयार नेटवर्कनुसार, भारतीय युजर्स दिवसातील 200 मिनिटं आणि अमेरिकेतील युजर्स दिवसातील 300 मिनिटं मोबाइल अॅप्लिकेशन वापरण्यावर खर्च करतात. यामध्ये भारतीय युजर्स सोशल मीडिया आणि एन्टरटेन्मेंट अॅप्लिकेशनला 70 टक्के वेळ देतात तर अमेरिकेतील युजर्स याच अॅप्लिकेशनला 50 टक्के वेळ देतात.
भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा सोशल मीडियामध्ये 95 टक्के शेअर आहे. अमेरिकेत हाच शेअर 55 टक्के आहे. भारतात एन्टरटेंन्मेंट अॅपमध्ये युट्यूबचा शेअर 47 टक्के असून अमेरिकेत हाच शेअर 17 टक्के आहे, अशी माहिती ओमिडयार नेटवर्कचे एमडी रूपा कुडवा यांनी दिली आहे.
3 लाख भारतीयांवर अप्रिल 2017 ते जून 2017च्यामध्ये हे विश्लेषण करण्यात आलं. महिलांचा प्रभावीपणे अॅप्लिकेशन आणि गॅजेड्सचा वापर करायला लागल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.