भारतातील कोरोना व्हेरिएंटचा जगात हाहाकार! 44 देशांमध्ये प्रादुर्भाव असल्याचे WHO ने सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:48 AM2021-05-12T10:48:14+5:302021-05-12T10:59:44+5:30
Coronavirus Variant : जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांकडून एक ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड झालेल्या 4500 हून पेक्षा जास्त नमुने आढळले आहेत.
नवी दिल्ली. जगातील अनेक देशांमध्ये भारतात (India) सापडलेल्या कोरोना व्हायरस व्हेरिएंटचीही (Coronavirus Variant)पुष्टी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहे की, भारतात कोरोना रुग्ण वाढीमागे B.1.617 व्हेरिएंट जबाबदार आहे. विशेष बाब म्हणजे भारताव्यतिरिक्त या व्हेरिएंटमधील सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळले आहेत. भारतात गेल्या मार्चपासून कोरोना संसर्गाच्या घटनांचा आलेख झपाट्याने वाढू लागला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांकडून एक ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड झालेल्या 4500 हून पेक्षा जास्त नमुने आढळले आहेत. ऑक्टोबरमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतात आढळला. या साथीच्या आजारावरील साप्ताहिक अपडेटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 'जागतिक आरोग्य संघटनेला पाच अतिरिक्त देशांमधील प्रकरणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत'. या आठवड्याच्या सुरूवातीस संघटनेने या व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' असे म्हटले होते.
यापूर्वी ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका येथे आढळलेल्या कोरोनाच्या इतर व्हेरिएंट्सचे नाव या यादीमध्ये समावेश होते. हे व्हेरिएंट्स वास्तविकपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे मानले जात होते. कारण ते एकतर वेगाने पसरू शकतात किंवा लसीच्या सुरक्षेपासून वाचण्यास सक्षम आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले की B.1.617 या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, कारण ते वास्तविक व्हायरसपेक्षा अधिक संसर्गजन्य दिसत आहेत. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने वाढणार्या घटनांवर जोर दिला आहे.
(कोरोनाचा भयावह वेग! मृतांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला; गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावला)
भारतात कोरोनाचा हाहाकार
30 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला भारत कोरोना व्हायसरच्या साथीमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावित देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात दररोज 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्याचबरोबर, दररोज सुमारे 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा राजधानी दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांवर मोठ्या प्रादुर्भाव आहे.