भारतीय महिलेने केसाने ओढली डबल-डेकर बस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:33 AM2022-01-05T06:33:46+5:302022-01-05T06:34:05+5:30
आशा राणी यांच्या मजबूत केसांनी नेटीझन्सला भुरळ घातली आहे. या केसांना मिळालेल्या शक्तीमागे काेणती शक्ती आहे, असा प्रश्नही विचारला आहे.
नवी दिल्ली : विश्वास बसणार नाही; परंतु भारतीय आशा राणी यांनी स्वत:च्या केसांनी डबलडेकर बस ओढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केले आहे. या विक्रमाचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यावर नेटिझन्स अवाक् झाले.
या डबल डेकर बसचे वजन १२ हजार किलोग्रॅम आहे. आशा राणी यांची वेणी घट्टपणे या बसला बांधल्याचे व्हिडिओत दिसते. आशा राणी या बस काळजीपूर्वक ओढताना दिसतात. जागतिक विक्रम स्थापन होताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. प्रचंड वजनदार वाहन (१२,२१६ किलोग्रॅम) आशा राणी यांनी केसांनी ओढले, असे व्हिडिओसोबत म्हटले.
२०१६ मध्ये आशा राणी यांनी अशी कामगिरी केली होती, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
मजबूत केसांमागे काेणती शक्ती?
आशा राणी यांच्या मजबूत केसांनी नेटीझन्सला भुरळ घातली आहे. या केसांना मिळालेल्या शक्तीमागे काेणती शक्ती आहे, असा प्रश्नही विचारला आहे. वजन उचलण्याच्या विलक्षण कौशल्यामुळे आशा राणी यांच्या नावावर सात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. त्यांनी लंडन डबल डेकर बस इटलीमध्ये ओढली होती. तेव्हाच त्यांना ‘पोलादी राणी’ (आयर्न क्वीन) असे म्हटले गेले होते.