CM झाल्यानंतर मोहन यादव पहिलीच निवडणूक हारले, भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत केवळ 5 मतं मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:45 PM2023-12-21T20:45:33+5:302023-12-21T20:47:32+5:30
मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहन यादव यांचा पराभव झाला आहे. ते भारतीय कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात होते. भारतीय कुस्ती महासंघासाठी चार उपाध्यक्ष निवडले जाणार होते. मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते.
मोहन यादव यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तोवर नामांकन मागे घेण्याची तारीख निघून गेली होती. आज झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालचे असीत कुमार साहा, पंजाबचे करतार सिंग, मणिपूरचे एन फोने आणि दिल्लीचे जयप्रकाश हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत मोहन यादव यांचा पराभव झाला. त्यांना केवळ पाच मतं मिळाली आहेत.
महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या मध्य प्रदेश कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच, संजय सिंह यांची भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
कुस्तीपटूंनी व्यक्त केली नाराजी -
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय कुमार सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आहे. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार आणि जवळचे सहकारी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडून देईन, असे साक्षी मलिक हिने म्हटले आहे. तर विनेश फोगट म्हणाली की, अपेक्षा खूप कमी आहेत, पण आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडायचे?