'शान' इंडिया ! NASA ने नव्हे तर भारतीय इंजिनिअरनेच 'विक्रम लँडर'चा पत्ता शोधला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:08 PM2019-12-03T13:08:03+5:302019-12-03T13:08:31+5:30
नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला
चेन्नई - अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केलाय, तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच हेही आता समोर येतंय. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या या युवक इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.
नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. आता, नासाने विक्रम लँडरचा शोध लागल्याचं सांगितलंय. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली.
नासाने भारतीय अभियंता शन्मुगा सुब्रमनियम याला विक्रम लँडर शोधण्याचं श्रेय दिलं होतं. 3 ऑक्टोबरलाच सुब्रमनियमने विक्रम लँडरचा ठावठिकाणा स्पष्टीकरणासह सांगितला होता. याबाबत नासानेही त्यांच्या संकेतस्थळावर ही गोष्ट नमूद केली आहे. शन्मुगाने दोन फोटो ट्विट केले होते. त्यापैकी एक फोटो 2017 चा होता आणि एक फोटो सध्याचा. यात त्याने नव्या फोटोत दिसणारा पांढरा ठिपका हा विक्रम लँडर असू शकतो हे असं म्हटलं होतं. त्यासाठी त्यानं इमेजचे पिक्सेल आणि विक्रम लँडरचे आकारमान याची गणितीय मांडणीही केली होती. त्याच्या आधारे हा विक्रम लँडर असण्याची शक्यता शन्मुगाने व्यक्त केली होती. त्यानंतर नासाने दोन महिन्यांनी विक्रम लँडर सापडल्याची माहिती दिली. शन्मुगानेही आज ट्विट करुन नासाने दिलेल्या क्रेडिटबद्दल माहिती दिली आहे.
@NASA has credited me for finding Vikram Lander on Moon's surface#VikramLander#Chandrayaan2@timesofindia@TimesNow@NDTVpic.twitter.com/2LLWq5UFq9
— Shan (@Ramanean) December 2, 2019
नासानं एक किलोमीटर अंतरावरुन विक्रम लँडरचे फोटो टिपले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या क्रॅश लँडिंगमुळे झालेला परिणाम दिसून येत आहे. विक्रमला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आलं नाही. विक्रमचं लँडिंग चुकल्यानं त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेले परिणाम नासानं टिपलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रोनं नासाशी संपर्क साधून विक्रम लँडरसंदर्भातील विस्तृत माहिती मागितली आहे. नासा विक्रम लँडरबद्दलचा एक अहवाल इस्रोला देणार आहे. यामधून विक्रमच्या क्रॅश लँडिंगबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल.
विक्रम लँडरच्या संदर्भातील माहिती मिळण्याची शक्यता नासानं याआधीच व्यक्त केली होती. विक्रमचं क्रॅश लँडिंग झालेल्या भागावरुन लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर जाणार असल्यानं विक्रम लँडरशी संबंधित माहिती हाती लागू शकते, अशी शक्यता नासाकडून वर्तवण्यात आली होती. याआधी 17 सप्टेंबरला नासाचं ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेलं होतं. मात्र त्यावेळी विक्रमशी संबंधित माहिती नासाला मिळाली नव्हती.
The #Chandrayaan2 Vikram lander has been found by our @NASAMoon mission, the Lunar Reconnaissance Orbiter. See the first mosaic of the impact site https://t.co/GA3JspCNuhpic.twitter.com/jaW5a63sAf
— NASA (@NASA) December 2, 2019