रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारतीयांना माहीत आहे, मोदींचा इम्रानला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:12 PM2019-04-17T23:12:10+5:302019-04-17T23:12:45+5:30
नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होईल, असे वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली - भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होईल, असे वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इम्रान खानने टाकलेल्या रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारीतायांना चांगलेच माहित आहे, असा टोला मोदींनी लगावला.
नवभारत टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,'' इम्रान खान रिव्हर्स स्विंग टाकून भारतातील लोकसभा निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारीतायांना चांगलेच माहीत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी मोदी नावाचा जोरदार वापर केला होता. मोदी का जो यार है, वो गद्दार हे असा नारा देत त्यांनी निवडणूक जिंकली होती.'' असा टोलाही मोदींनी इम्रान खानला लगावला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असे म्हटले होते. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत यावेळी व्यक्त केले होते. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटले होते. यासोबतच इम्रान खान यांनी एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असे दोन नरेंद्र मोदी पाहायला मिळणार असल्याचे म्हटले होते.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास शांततेच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते.