देशांतर्गत पर्यटनालाच भारतीयांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:25 AM2019-05-02T04:25:25+5:302019-05-02T04:26:11+5:30
ट्रॅव्हल पोर्टलने केली पाहणी : खिसा पाहूनच दिला जातो प्रवास करण्यावर भर
नवी दिल्ली : पर्यटनासाठी विदेश भ्रमंतीकडे ओढा वाढलेल्या भारतीय पर्यटकांनी या वर्षी देशांतर्गत माफक खर्चाच्या पर्यटनाला पसंती दर्शविली आहे. प्रवासासंबंधी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. निम्म्यापेक्षा अधिक भारतीय पर्यटक कमी खर्चाच्या देशी पर्यटनाकडे वळले असल्याचे ‘यात्रा’ या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने सर्वेक्षण अहवाल जारी करताना म्हटले आहे.
या वर्षी पर्यटनाची तयारी केलेल्या ६८ टक्के भारतीयांपैकी निम्म्यापेक्षा अधिक पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाची योजना आखली आहे. यापैकी ६४ टक्के पर्यटकांचे उत्तर देशी पर्यटन हेच होते. उन्हाळी सुट्यांत फक्त १० हजार ते २५ हजार रुपयांचा खर्च करण्यावर ४५ टक्के पर्यटकांनी भर दिला आहे. रात्रीच्या हॉटेल वास्तव्यात एक हजार ते अडीच हजार खर्च करण्याची तयारी ४३ टक्के पर्यटकांनी दर्शविली आहे. देशाटन करताना खिशाचा विचार आलाच. हॉटेल खर्चाला फाटा देण्यावर भर देताना १५ टक्के पर्यटकांनी घरगुती वास्तव्याला अधिक पसंती दर्शविली. भारतात भेटी न दिलेली अनेक सुंदर स्थळे असून देशांतर्गत पर्यटनाकडे वाढता कल, निश्चितच उत्साहवर्धक असल्याचे ‘यात्रा’चे शरत धाल यांनी म्हटले.
काय सांगतो सर्वेक्षणाचा अहवाल...
पर्यटकांची ऑनलाइन रिव्ह्यूवर निर्भरता वाढली आहे. बुकिंग करताना आकर्षक डिस्काउंटसह आधीच तयारी करण्यावर भर.
पर्यटक १५ दिवस तर ४० टक्के पर्यटक किमान तीन महिने आधी बुकिंग करतात.