अमेरिकेतील भारतीयांनी केले निकालाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:19 AM2019-11-11T04:19:04+5:302019-11-11T04:19:22+5:30
रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समतोल निकालामुळे हिंदू-मुस्लिम या दोघांचाही विजय झाला आहे, असे अमेरिकेतील भारतीयांनी म्हटले
नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समतोल निकालामुळे हिंदू-मुस्लिम या दोघांचाही विजय झाला आहे, असे अमेरिकेतील भारतीयांनी म्हटले असून, त्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर प्रभू श्रीरामाचे मंदिर केंद्र सरकारने स्वत: ट्रस्ट स्थापन करून उभारावे आणि त्याठिकाणी ४५० वर्षे उभी असलेली मशीद बेकायदेशीरपणे पाडल्याने मुस्लिम समाजावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला नवी पर्यायी मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच पाच एकर मोक्याची जागा दिली जावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला होता.
त्यासंदर्भात हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या संघटनेने म्हटले आहे की, रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्या खटल्याशी संबंधित सर्वांचाच विजय झाला आहे. पुरातत्वतज्ज्ञ, इतिहासकार, भारतीय कायदेतज्ज्ञ या सर्वांचाच हा विजय आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांच्या संघटनांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
>समतोल निकालाचे स्वागत
फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज (एफआयआयडीएस) या संघटनेने म्हटले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत दिलेला समतोल निकाल आगामी काळात अनेक खटल्यांमध्येही मार्गदर्शक ठरणार आहे.
कोणत्याही समस्येवर तटस्थपणे विचार करून कसा तोडगा काढता येतो, हे रामजन्मभूमी खटल्याच्या निकालातून दिसून आले. वादग्रस्त भूमीचा ताबा हिंदूंना देण्यात आला व मुस्लिमांना पर्यायी नवी जमीन देण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला.
त्यामुळे कोणत्याही समुदायावर अन्याय होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही एफआयआयडीएसने म्हटले आहे.