अमेरिकेचा व्हिसा असलेल्या भारतीयांना आता थेट दुबईत प्रवेश
By admin | Published: May 2, 2017 08:29 PM2017-05-02T20:29:46+5:302017-05-02T21:33:15+5:30
अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 2 - अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला आहे. अमेरिकेचा व्हिसा असलेल्या पहिल्या भारतीय पासपोर्ट धारकाचं दुबईमध्ये स्वागत करण्यात आलं. 1 मे पासून अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश सुरू झाला असून दुबईमध्ये दाखल झालेल्या पहिल्या प्रवाशाचा फोटो दुबईच्या सरकारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यूएईच्या कॅबिनेटनं या विधेयकाला मंजुरी दिली होती. 1 मे पासून त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं यूएईनं हे पाऊल उचललं आहे. त्याप्रमाणेच जागतिक पर्यटनालाही चालना देण्याचा यूएईचा उद्देश आहे.
हा व्हिसा 14 दिवसांपुरता मर्यादित असल्याचं सांगितलं जात असून अतिरिक्त शुल्क देऊन तुम्हाला हा व्हिसा आणखी वाढवता येणार आहे.ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिसा मिळणार आहे. या व्हिसाचं नूतनीकरण करायचे असल्यास तुम्हाला अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती यूएईनं दिली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 6 हजार कोटी डॉलरची उलाढाल होते. मेक इन इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे. यूएई भारतात 2700 कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत 45,000 कंपन्यांच्या माध्यमातून 3300 कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो. त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.