Corona Vaccination: "100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 06:33 AM2021-10-23T06:33:01+5:302021-10-23T06:34:03+5:30
माेदींचा देशवासीयांशी संवाद, सणासुदीत सावधतेचा इशारा
नवी दिल्ली : काेराेना प्रतिबंधक लसींचे १०० काेटी डाेस देण्याचे एक महत्त्वाचे लक्ष्य गाठले. मात्र, हा केवळ एक आकडा नसून हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. काेराेनाविरुद्ध युद्ध सुरू असून शस्त्रे खाली ठेवू नका, असा सूचनावजा इशाराही पंतप्रधानांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दिला.
काेराेना प्रतिबंधक लसींचे १०० काेटी डाेस देण्याचा टप्पा भारताने पार केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान माेदी यांनी देशवासीयांसाेबत संवाद साधला. ते म्हणाले, की इतिहासाचा नवा अध्याय रचला गेला आहे. हे देशवासीयांचे आणि भारताचे यश आहे. कठीण ध्येय गाठणाऱ्या नव्या भारताचे हे प्रतिबिंब आहे. आज अनेक जण या लसीकरणाची तुलना इतर देशांशी करत आहेत. जगातील इतर देश लसींवर संशाेधन करण्यात तज्ज्ञ हाेते. शतकातील सर्वात माेठी महामारी आली, तेव्हा भारत लसी कुठून आणणार, पैसा कसा उभारणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना १०० काेटी लसींचे डाेस उत्तर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
लसीकरणात काेणताही भेदभाव करण्यात आला नाही. काेणतेही व्हीआयपी कल्चर शिरू दिले नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वांचे लसीकरण झाले. अनेक देशांमध्ये संकाेच ही समस्या निर्माण झाली आहे. संकाेच दूर कसा करता येईल, याचे उत्तर भारताने दिले आहे, असे माेदी म्हणाले.
लसीकरणाने चिलखत दिले आहे. ते संरक्षण देत आहे. तरीही काेराेनाविरुद्ध युद्ध सुरू असून शस्त्र खाली ठेवू नका. सण, उत्सव साजरे करताना काळजी घ्या, असा सावधगिरीचा इशाराही माेदींनी दिला.
आराेग्य कर्मचाऱ्यांचे आभार
भारताने इतिहास रचला आहे. आपले डाॅक्टर्स, नर्स आणि त्या सर्वांना धन्यवाद, ज्यांनी हे लक्ष्य गाठण्यास मदत केली, असे सांगून पंतप्रधानांनी आराेग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
भारताने लसीकरणासाठी काेविन यंत्रणा उभारली. या ॲपचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. १०० काेटी डाेसांचे लक्ष्य गाठणे साेपे नव्हते. मात्र, ते शक्य झाले आहे, असे माेदी म्हणाले.
अर्थव्यवस्था सकारात्मक
देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत देश आणि परदेशांतील अनेक संस्था सकारात्मक आहेत. भारतात विक्रमी गुंतवणूक येत असून तरुणांसाठी राेजगारच्या संधीही निर्माण हाेत आहेत. स्टार्टअपमध्ये रेकाॅर्ड गुंतवणूक हाेत आहे, असे माेदी म्हणाले.
पंतप्रधान माेदींनी सणासुदीच्या निमित्ताने देशवासीयांना भारतात निर्मित झालेल्या वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले. दिवाळीचा माेठा सण जवळ येत आहे. बाजारात खरेदी वाढत आहे. या दिवाळीला शक्यताे मेड इन इंडिया वस्तूंची खरेदी करा, असे आवाहन माेदींनी केले.