कसे असेल बडोद्यातील रेल्वे विद्यापीठ? पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:54 PM2018-08-24T12:54:07+5:302018-08-24T12:55:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार या विद्यापिठाची स्थापना करण्यात आली असून पुढील महिन्यामध्ये विद्यापिठाचे अभ्यासक्रम सुरु होतील.
नवी दिल्ली- भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार या विद्यापिठाची स्थापना करण्यात आली असून पुढील महिन्यामध्ये विद्यापिठाचे अभ्यासक्रम सुरु होतील.
बडोद्याच्या या रेल्वे विद्यापिठामध्ये पदवीचे दोन अभ्यासक्रम असून पहिल्या वर्षासाठी 103 मुलांची निवड करण्यात आली. शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरु होणार आहेत. यामध्ये 17 मुलींचा समावेश असून त्यांच्यासाठी वेगळ्या वसतीगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट आणि बॅचलर ऑफ सायन्स इन ट्रान्स्पोर्ट टेक्नोलजी असे दोन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 4 सप्टेंबर रोजी विद्यापिठात उद्घाटन कार्यक्रम होईल व दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु होतील.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी या विद्यापिठाचे कुलगुरू असतील. एक्सएलआरआय स्कूल ऑफ मॅनेजमेंट, इंडियन बिझिनेस स्कूल हैदराबाद अशा विविध संस्थांमधील अध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येणार आहेत. सुरुवातीच्या तुकडीला त्यांच्या फीमध्ये 50 टक्के रक्कम स्कॉलरशिपरुपाने मिळणार आहे. सरकारी स्कॉलरशिपसह या अभ्यासक्रमांसाठी 75 हजार फी असेल.
2014 साली केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर मांडण्यात आलेल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात या विद्यापिठाची घोषणा करण्यात आली होती.