लडाखमध्ये भारताच्या ५० हजार सैनिकांची चीनवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:30 AM2022-11-16T11:30:50+5:302022-11-16T11:31:14+5:30
Indian Army: पूर्व लडाखमध्ये हिवाळ्यात चीनच्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) डेमचोक आणि डेपसांग येथे ५० हजार सैनिकांसाठी शस्त्रे व सर्व आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये हिवाळ्यात चीनच्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) डेमचोक आणि डेपसांग येथे ५० हजार सैनिकांसाठी शस्त्रे व सर्व आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे.
एलएसीवर तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशासाठी एक लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. मे, २०२० मध्ये गलवानमध्ये चीनच्या हल्ल्यानंतर हे तिसरे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये भारतीय सैन्य हिवाळ्यात चिनी कुरापती हाणून पाडण्यासाठी तयारी करत आहे. गलवाननंतर भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या आहेत, तरीही चीन आपले सैन्य पूर्वीच्या स्थितीत आणत नाही. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी याबाबत सांगितले की, चीनने एलएसीवरील सैन्य कमी केलेले नाही. हिवाळ्यात चीन आपली लष्करी जमवाजमव वाढवू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांसाठी विशेष तीन थरांचा गणवेश प्रदान करण्यात आला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चौकीवर विशेष थर्मो टेंट लावण्यात आले आहेत.