भारताची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी चांद्रयान-२
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:58 AM2019-07-23T02:58:50+5:302019-07-23T02:59:20+5:30
प्रक्षेपणात मोहिमेत ढगाळ वातावरणाचा धोका होता. मात्र, चंद्राच्या दिशेने झेपावणाऱ्या यानाच्या आड कसलीही अडचण आली नाही
निनाद देशमुख
श्रीहरिकोटा : चांद्रयान-२ अवकाशात झेपावेपर्यंत सर्व शास्त्रज्ञांनी आपला श्वास रोखून धरला होता. थोड्याच वेळात यानाचे बूस्टर वेगळे झाले आणि चांद्रयान २ अखेर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावताच साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली भारताची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली. त्यानंतर सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष केला. १६ दिवस हे यान पृथ्वीभोवती फिरणार असून, त्यानंतर ते चंद्राकडे वाटचाल करणार आहे.
चांद्रयान-२ अवकाशात झेपावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: टीव्हीसमोर बसून होते. उड्डाणानंतर त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि देशभरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही भारतीय शास्त्रज्ञांचे भरभरून कौतुक केले. मागील सोमवारी चांद्रयान- २ च्या प्रक्षेपणाच्या ५६ मिनिट २४ सेंकदाआधी प्रक्षेपकाच्या तिसºया स्टेजमधील क्रायोजनिक इंजिनाच्या टाकीत गळती आढळल्यामुळे ऐनवेळी प्रक्षेपण स्थगित करावे लागले होते. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आठवडाभरात ही गळती दूर करून चांद्रयानाच्या पुनर्प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली. त्यानुसार सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी यानाच्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण करण्यात आली होती. प्रक्षेपणात कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी काळजी घेतली होती. सकाळपासूनच सतीश धवन अंतराळ केंद्र्रातील निंयत्रण कक्षात जीएसएव्ही मार्क ३ प्रक्षेपकाच्या प्रत्येक बाबीवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून होते. इंधनाच्या टाकीतील दोष दूर करण्यात आल्यामुळे सकाळी प्रक्षेपकाचे काऊंट डाऊन सुरू झाले होते. प्रक्षेपणाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. हा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोकही प्रक्षेपणाकडे डोळे ठेवून होते.
पुढील वर्षी ‘इस्रो’ची सूर्यस्वारीची योजना
‘चांद्रयान-२’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीस सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य एल-१’ हे यान पाठविण्याची भारतीय अंतराळ संशोधन संघटनेची (इस्रो) योजना आहे. सूर्यस्वारीवर जाणारे हे यान सूर्याच्या भोवती असलेल्या हजारो किमी उंचीच्या अतितप्त ज्वालावलयाचा (कोरोना) अभ्यास करील.
‘चांद्रयान-२’च्या माहितीसोबच ‘इस्रो’ने या भावी योजनेचेही सूतोवाच त्यांच्या वेबसाईटवर केले. ‘इस्रो’ने म्हटले की, सूर्याचा हा ‘कोरोना’ निरंतर एवढा तप्त कसा होतो, हे सौरभौतिकेतील अद्याप न उलगडलेले कोडे आहे. दीड कोटी किमी दूर असलेला ‘तेजोनिधी’ सूर्य हाच पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या उत्पत्तीचा व ती टिकून राहण्याचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे सूर्याची प्रकृती नेमकी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेतही या सूर्य मिशनचे सूतोवाच केले होते. ते यान सन २०२० च्या सुरुवातीस रवाना होईल, असे ते म्हणाले होते.
जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी होते हजर
प्रक्षेपणात मोहिमेत ढगाळ वातावरणाचा धोका होता. मात्र, चंद्राच्या दिशेने झेपावणाऱ्या यानाच्या आड कसलीही अडचण आली नाही. मीडिया सेंटरच्या इमारतीवरून भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून माध्यमांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी आले होते. मोहीम प्रमुखांनी शेवटच्या १० मिनिटांच्या उलट गणतीला सुरुवात केली.
प्रक्षेपणाची वेळ जशी जवळ आली तशी सेकंड लाँच पॅडच्या दिशेने कॅमेरे आणि मोबाईल सरसावले. प्रक्षेपणासाठी केवळ १० सेकेंद असताना मोहीमप्रमुखांनी उलट गणती सुरू केली. पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य होताच लाँच पॅडच्या दिशेतून मोठा आवाज झाला. काही क्षणात जीएसएलव्ही प्रक्षेपक ‘चांद्र्रयान-२’ला घेऊन अवकाशात झेपावले अन् उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
आत्मविश्वास होता बोलका
सतीश धवन अंतराळ केंद्रातील मुख्य नियंत्रण केंद्रातून सर्व शास्त्रज्ञ प्रक्षेपकाच्या वेगावर लक्ष ठेवून होते. पहिल्या काही मिनिटांत प्रक्षेपकाचे दोन बूस्टर वेगळे झाले. प्रक्षेपक वर जाताना शास्त्रज्ञांच्या चेहºयावरचा आत्मविश्वास झळकत होता. काही मिनिटांच्या अवधीतच यानाचा पृथ्वीच्या कक्षेत जाण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. काही वेळात दुसºया टप्प्यातील इंजिन यानापासून वेगळे होऊन क्रायोजनिक इंजिन सुरूझाले अन् चांद्र्रयान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावताच चांद्रयानावरील कॅमेºयातून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. प्रक्षेपणापासून चांद्रयान दूर झाले अन् सर्वांनी जल्लोष केला. नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांनी जल्लोष करीत एकमेकांना मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्या दिल्या.
‘आदित्य एल-1’
मध्ये सूर्याच्या ‘कोरोना’खेरीज त्याच्या तेजोवलयाचा (फोटोस्फीयर) व ऊर्जावलयाचा (क्रोमोस्फीयर) चा अभ्यास करण्यासाठीही उपकरणे असतील. सध्या पृथ्वीवर जाणवत असलेल्या वातावरण बदलाचे मूळ सूर्यामध्ये ठराविक काळाने होणाºया बदलांमध्ये असल्याने हा अभ्यास या बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीही उपयोगी ठरू शकेल.
सूर्यापासून निघणाºया अतिउच्च ऊर्जाभारित कणांचा माराही पृथ्वीवर होत असतो. याच्या अभ्यासासाठीही ‘आदित्य’ यानातून उपकरणे पाठविली जाऊ शकतील. मात्र, हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा अडथळा येणार नाही एवढ्या उंचीवर स्थिर करूनच अभ्यास शक्य होईल.