भारताचा वाहन उद्योग पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:10 IST2025-01-19T08:09:39+5:302025-01-19T08:10:01+5:30
वाहन विक्रेत्यांची संघटना ‘फाडा’ या संस्थेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, भारतीय वाहनांची मागणी जागतिकस्तरावर अधिक आहे.

भारताचा वाहन उद्योग पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योगात आतापर्यंत ४.५ कोटी रोजगार निर्माण झाल्याचा उल्लेख करताना शनिवारी सांगितले की, भारताचा वाहन उद्योग आगामी पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल.
वाहन विक्रेत्यांची संघटना ‘फाडा’ या संस्थेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, भारतीय वाहनांची मागणी जागतिकस्तरावर अधिक आहे. ते म्हणाले की, भारतीय वाहन उद्योगाचा आकार आता २२ लाख कोटी रुपये आहे.
मला विश्वास आहे की, पाच वर्षांत भारतीय वाहन उद्योग जगात प्रथम क्रमांकावर येईल. सध्या अमेरिकेच्या वाहन उद्योगाचा आकार ७८ लाख कोटी आहे. त्यानंतर चीन (४७ लाख कोटी) आणि भारत (२२ लाख कोटी) यांचा क्रमांक आहे.
४.५ कोटी नोकऱ्या दिल्या
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, वाहन उद्योगाने आतापर्यंत ४.५ कोटी रोजगार निर्माण केले आहेत.
जे देशातील सर्वाधिक आहेत. वाहन उद्योग राज्य सरकार आणि भारत सरकारला जीएसटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महसूल देत आहे. ते म्हणाले की, भारतात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांपैकी ५० टक्के दुचाकी निर्यात केल्या जातात.