कुलभूषण यांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची लढाई सुरु
By admin | Published: May 15, 2017 11:17 AM2017-05-15T11:17:27+5:302017-05-15T14:38:53+5:30
भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. नेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल ऑफ जस्टिसमध्ये ही सुनावणी सुरू आहे. प्रत्येकी दीड तासांच्या दोन सत्रांमध्ये या खटल्याची सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 ते 3 या वेळात भारत आपली बाजू मांडेल तर, 6.30 ते 8 या वेळात पाकिस्तान आपली बाजू मांडणार आहे.
भारताकडून प्रसिद्ध वकिल हरीश साळवे 15 न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय कोर्टात बाजू मांडत आहेत.
सुनावणीत भारताने मांडलेले मुद्दे
- पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचा भंग केला
- कुलभूषण जाधव यांना बचावाची एकही संधी दिली नाही, जाधव यांच्या आई-वडिलांच्या व्हिसाच्या अर्जावर पाकिस्तानने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.
- भारताने अनेकदा कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याची विनंती केली पण पाकिस्तानने सातत्याने विनंती फेटाळली.
- सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
- कुलभूषण जाधव व्यापारी आहेत. इराण येथून त्यांचे अपहरण करुन नंतर त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले.
- कुलभूषण जाधव यांचा बळजबरीने कबुलीजबाब घेण्यात आला.
- पाकिस्तानने व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन केले आहे.
- पाकिस्तानकडे जे पुरावे आहेत ते अजिबात विश्वसनीय नाहीत.
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पाकिस्तानी लष्कर न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानविरोधात हेरगिरी व हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करत सांगितले की, पाकिस्तानी लष्कर न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेवर तातडीनं अंमलबजावणी न होता जाधव यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक संभाव्य पर्यायाचा विचार करण्यात यावा.
यावर राजनैतिक अधिकारी जी पार्थसारथी म्हणाले आहेत की, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जाधव प्रकरणावरील सुनावणीद्वारे भले कोणताही निर्णय न येवो, मात्र याद्वारे एक आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण होईल. यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण होईल आणि संपूर्ण जगाला एक स्पष्ट संदेश मिळेल की न्यायाच्या नावावर लष्करी न्यायालयांना अशाप्रकारे जबाबदारी देणं उपयुक्त नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय मर्यादेविरोधात आहे. पाकिस्तानसंबंधी कोणताही मुद्दा परस्पर सहमतीनं सोडवण्याची भूमिका आतापर्यंत भारतानं स्वीकारली आहे. मात्र जाधव यांचं प्रकरण भारतानं आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित केले आहे.
जी पार्थसारथी यांचं यावर असे म्हणणे आहे की, द्विपक्षीय प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात मान्यता मिळत नाही ही बाब स्पष्ट आहे. 2001 मध्ये कारगिल युद्धानंतर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात "भारतानं त्यांचे सैनिक विमान पाडलं", अशी याचिका दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं हे प्रकरणास स्पष्टपणे नकार दिला होता. कारण पाकिस्तान किंवा अन्य देशांसोबत द्विपक्षीय प्रकरणांत सहभागी होणार नाही, असे सांगत
भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सदस्यत्व घेण्यास नकार दिला होता.
मात्र दुसरीकडे, एक वेगळ्या करारावर भारत व पाकिस्ताननं स्वाक्षरी केली होती, ज्यानुसार एखाद्या देशातील नागरिकासोबत दुस-या देशात अन्याय होत असेल किंवा वाईट वागणूक मिळत असेल तर याप्रकरणी ते आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेऊ शकतात.
पार्थसारथी यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानी लष्करी न्यायालयाऐवजी कुलभूषण यांना सिव्हिल कोर्टासमोर सादर केले असते तर कदाचित आक्षेप नोंदवण्यात आला नसता. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मांडलेली भूमिका ही आंतरराष्ट्रीय न्यायालयविरोधी आहे. ना त्यांना कोणाला भेटू दिलं, नाही त्यांना कोणत्याही प्रकारे कायदेशीर स्वरुपातील मदत देण्यात आली. जाधव यांच्याविरोधात कोणकोणत्या प्रकरणांअंतर्गत खटला चालवण्यात आला याचीही माहिती भारताला देण्यात आली नाही.
दरम्यान, भारताने याबाबत 8 मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने 16 वेळा विनंती केली होती, पण परराष्ट्र नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने मागणी फेटाळली, असेही भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
10 आॅगस्ट 1999 रोजी भारताने कच्छच्या रणात पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान पाडले होते. यात नौदलाचे 14 जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पाकिस्तानने 60 दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या न्यायालयात दावा केला होता. 21 जून 2000 रोजी 16 न्यायाधीशांच्या पीठाने 14 विरुद्ध 2 अशा बहुमताने हा दावा फेटाळला होता.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.