काबूल हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल; 100 हून अधिक शिख-हिंदूंना दिला ई-व्हिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:02 PM2022-06-19T18:02:42+5:302022-06-19T18:03:49+5:30
गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंसाठी प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर केला आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे गुरुद्वाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंना प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर करून दिला आहे. हा व्हिसा ऑनलाइनही मिळवता येऊ शकतो.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की काबुल हल्ल्यानंतर, गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंसाठी प्राधान्याने ई-व्हिसा मंजूर केला आहे. भारत सरकारने जारी केलेला हा ई-व्हिसा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करूनही मिळवता येऊ शकतो. तर दुसरीकडे, गुरुद्वारावर हल्ला झाल्यापासून भारताचे परराष्ट्र मंत्रालय याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.
यापूर्वी, तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जा दरम्यान, गेल्या वर्षी 15 ऑगस्टला गृह मंत्रालयाकडून ई-व्हिसा जारी करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात एका शीख व्यक्तीसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यादरम्यान एका बंदुकधाऱ्याने एक हँडग्रेनेड फेकले होते. यामुळे गुरुद्वाऱ्याच्या गेटजवळ आग लागली. यावेळी अफगाणिस्तानच्या एका सुरक्षा रक्षकाने स्फोटकांनी भरलेली गाडी गुरुद्वाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने, आणखी एक मोठी दुर्घटना टळली.
घटनाक्रमावर भारताची बारीक नजर -
या हल्ल्यानंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, काबुल शहरातील पवित्र गुरुद्वाऱ्यावर हल्ल्याच्या वृत्तानंतर आम्ही चिंतीत आहोत. तर परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, गुरुद्वारा कार्त-ए-परवान वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वांनी तीव्र शब्दात निशेद करायला हवा. हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून आम्ही घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.