२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:56 AM2023-01-11T11:56:05+5:302023-01-11T11:56:16+5:30
जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.
भारतात २०२१ मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.
तारखा पुढे ढकलल्या...
नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते.
जनगणना याआधी कधी झाली नाही?
भारतात जनगणनेच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली आहे. १९४१ दुसऱ्या महायुद्धामुळे जनगणनेला उशिर झाला असला तरी सर्वेक्षणाचे काम वेळेवर पूर्ण करून माहितीचे संकलन केले होते. १९६१भारत-चीन युद्ध वेळीही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. १९७१ बांगलादेश निर्मिती वेळी पाकिस्तान सोबत युद्ध झाले. पण याही वर्षी जनगणना नीटपणे पूर्ण करण्यात आली.
जनगणना का गरजेची?
पहिली जनगणना १८८१ साली झाली. नंतर दर १०-१० वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर १० वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. २०२१ मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा यात खंड पडणार आहे.याआधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.
इतर देशांमध्ये जनगणनेचे काय झाले?
मेरिकेत कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही २०२० मध्ये जनगणना करण्यात आली.इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमध्ये ही कोरोना महामारी सुरु असताना विविध यंत्रणांनी ठरलेल्या वेळी माहिती जमवण्याचे काम सुरु केले.ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला तिथेही जनगणना ठरलेल्या वेळी पार पडली.