भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-2 मिशन लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 09:13 IST2018-08-05T09:12:46+5:302018-08-05T09:13:21+5:30
भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे.

भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-2 मिशन लांबणीवर
नवी दिल्ली - भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण पुन्हा एकदा काही काळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र आता ही मोहीम डिसेंबर 2018 पर्यंत टाळण्यात आली आहे.
याआधी चंद्रयान-2चे प्रक्षेपण गतवर्षी एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे भारताची ही मोहीम लांबणीवर पडत आहे. दरम्यान, चंद्रयान मोहीम लांबणीवर पडल्याने चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे.
चंद्रयान-2 मोहिमेला होत असलेल्या उशिरासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी याआधीच चंद्रावर आपले उपस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, चंद्गावर पोहोचणारा चौथा देश बनण्यासाठी भारत आणि इस्राइल या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीन लांबणीवर पडल्यामुळे इस्राइलकडे चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची चालून आली आहे.
भारताची ही दुसरी चंद्र मोहीम आहे. दरम्यान, चंद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. चंद्रयान-2 या अंतराळ यानाचे वजन 3 हजार 290 किलोग्रॅम आहे. तसेच हे यान चंद्राच्या चारी बाजूनी भ्रमण करून त्याची आकडेवारी एकत्र करेल.