भारताच्या चंद्रयान-2 चे प्रक्षेपण तात्पुरते लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:37 PM2019-01-01T15:37:07+5:302019-01-01T15:38:58+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्त्रो) चंद्रयान-2 या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी लांबणीवर पडले आहे.
बंगळुरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ( इस्त्रो) चंद्रयान-2 या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी लांबणीवर पडले आहे. येत्या 3 जानेवारी रोजी इस्रो चंद्रयान-2 चे प्रक्षेपण करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्राच्या अज्ञात भागात भारताआधी यान उतरवण्याची संधी चीनला मिळाली आहे. चीनचे चांगी-4 हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले असून, ते लवकरच चंद्राचा अद्याप समोर न आलेल्या भागावर उतरणार आहे.
चंद्रयान-2चे लवकरच प्रक्षेपण करण्यात येईल, असे याआधी इस्रोकडून जाहीर करण्यात आले होते. इस्रो चंद्रयान-2 चे लवकरात लवकर प्रक्षेपण करू इच्छित आहे. मात्र त्याच्या प्रक्षेपणाची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. दरम्यान, 2018 च्या अखेरच्या महिन्यांमध्ये इस्रो इतर मोहिमांच्या प्रक्षेपणात व्यस्त असल्याने चंद्रयानाचे प्रक्षेपण प्रभावित झाले, असे इस्रोचे चेअरमन सिवन यांनी सांगितले.
''चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्चा तारखेबाबत मी सध्यातरी काही सांगू इच्छित नाही. येत्या 10-12 दिवसात याबाबत आम्ही निर्णय घेऊ,'' चीनचे चांगी-4 आणि भारताच्या चंद्रयान-2 यांच्यात चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यासाठी स्पर्धा होती. दरम्यान, आता यात चीनच्या यानाने बाजी मारली आहे. हे यान आता चंद्राच्या पृथ्वीपासून दूर असलेल्या भागात उतरणार आहे. तर चंद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. या भागाबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, चांगी-4 हे यान योजनेनुसार चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. आता ते चंद्राच्या पृथ्वीपासून दूर असलेल्या भागात उतरणार आहे. मात्र हे यान चंद्रावर कधी उतरणार आहे, याबाबात माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे इस्रोनेसुद्धा चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची तयारी केली आहे. मात्र या यानाचे प्रक्षेपण 2017 आणि 2018 या दोन वर्षांमध्ये दोन वेळा टाळण्यात आले होते. आता चंद्रयान-2कडे चंद्रावर उतरण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. चांद्रयान-2 मोहिमेमध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. त्यानंतर एक रोव्हर चंद्राच्या पृष्टभागाचा तपास आणि प्रयोग करणार आहे.