'भारताच्या सर्जनशीलतेची अवघ्या जगाला भुरळ', ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’मध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:15 IST2025-04-14T10:10:19+5:302025-04-14T10:15:18+5:30
‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापिका आणि संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा लोकमत वृत्तपत्र समूहाचा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरणाचा दिमाखदार सोहळा दिल्लीत पार पडला.

'भारताच्या सर्जनशीलतेची अवघ्या जगाला भुरळ', ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’मध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध
नवी दिल्ली : भारतीय संस्कृती नव्या दमाने आपले स्थान निर्माण करीत आहे. गीत, संगीत, कला आणि विज्ञानासह विविध विषयांतील क्रियेटिव्हिटीचा अंगीकार संपूर्ण विश्वाकडून होत असताना संगीत साधकांचा सन्मान अभिनंदनीय आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापिका आणि संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा लोकमत वृत्तपत्र समूहाचा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरणाचा दिमाखदार सोहळा दिल्ली कँट येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पद्मविभूषण सोनल मानसिंग, पद्मभूषण राजीव सेठी, राज्यसभेचे खासदार अभिषेक मनू सिंघवी आणि लोकमत दिल्ली आवृत्तीचे प्रकाशक राकेश शर्मा उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते प्रसिद्ध गजल गायक पद्मश्री अहमद हुसैन व पद्मश्री मोहम्मद हुसैन या भावंडांना ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत लीजेंड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर प्रसिद्ध सूफी संगीततज्ज्ञ अनिता सिंघवी यांना ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शेखावत म्हणाले की, सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा केवळ एक अवॉर्ड नसून समाजसेवा आणि महिला सशक्तीकरणाच्या पुरस्कर्त्या ज्योत्स्ना दर्डा यांना खरी श्रद्धांजली आहे. हा पुरस्कार विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करणारा आहे.
गुरूद्वारा रकाबगंज साहिब, दिल्ली मराठी प्रतिष्ठान, द्वारका मराठी मंडळ, रमाई ग्रुप आणि ऑल इंडिया सिद्धार्थ वेलफेअर सेंटरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. दिल्ली कँट येथील केंद्रीय विद्यालयाचे शिक्षकही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
गायक अनुप जलोटा, गायिका सुनाली रूपकुमार राठोड, शशी व्यास, टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर आणि ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.
संगीत म्हणजे ऊर्जा आणि शांतीचा स्रोत -डॉ. विजय दर्डा
संगीत निसर्गाची सर्वांत मोठी देणगी असून, संगीत माणसाला ऊर्जा आणि शांती प्रदान करणारा स्रोत आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी केले.
डॉ. दर्डा म्हणाले की, 'संगीत एक स्वयंपूर्ण विज्ञान असून, दैनंदिन जीवनात माणसाला लागणारी ऊर्जा आणि शांती प्रदान करणारे आहे. माणसाने प्रकृतीपासून निर्माण झालेल्या ध्वनीला आपल्या आवाजाची जोड दिली आणि संगीत निर्माण झाले.'
'संगीततज्ज्ञांनी विविध रागांची रचना केली. संगीताला समृद्ध करणाऱ्या या महान विभूतींचे आपण ऋणी आहोत. जीवनाला संगीताची जोड मिळाली नसती, सूर आणि तालाची जुगलबंदी नसती, गीत आणि संगीताचा स्पर्श झाला नसता, सूर, साज आणि संगीताची त्रिवेणी धारा नसती, तर आपले जीवन किती निरस आणि कंटाळवाणे झाले असते, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा पुरस्कार मिळविणाऱ्या गायकांनी संगीताच्या दुनियेत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या अकरा वर्षांत ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते आता देशातील प्रमुख कलाकार म्हणून ओळखले जातात.'
आठवणी सांगताना डॉ. दर्डा म्हणाले की, 'ज्योत्स्ना लहानपणापासून संगीत शिकत होत्या. त्या तासनतास रियाज करायच्या. संगीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. संगीतात रमून त्या स्वतःचे दुःखही विसरून जात होत्या. कर्करोगासारख्या गंभीर आजारपणातही त्यांनी कधी संगीताची साथ सोडली नाही. म्हणूनच त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी ‘लोकमत’ने संगीत हे माध्यम निवडले. मात्र, संगीताला आणखी समृद्ध करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
मामे खान यांच्या गायकीला दाद
लोक गायक मामे खान यांनी ‘केसरिया बालम पधारो म्हारे देस’ आणि ‘जब भी देखू दिखाती लाल-पिली अंखिया’ या गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘वंदे मातरम’ या देशभक्तीवरील गाण्याला रसिकांनी हात उंचावून दाद दिली. ‘मीराबाई’चे भजन सादर करून त्यांनी कृष्णभक्तीला साद घातली, तर हनुमान जयंतीनिमित्ताने ‘राम किसी को मारत नही’ या भजनाने सभागृहातील वातावरण भक्तिमय झाले.
खासदार ते सरपंच सर्वांचा सन्मान : आझाद
ज्योत्स्ना दर्डा यांचा प्रेमळ स्वभाव आणि आदरातिथ्याचा उल्लेख करीत गुलाम नबी आझाद म्हणाले की, ‘लोकमत’कडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे मी निश्चिंत झालो आहे. भारतातील मुशायरा संस्कृती जशी लोप पावत चालली आहे तशीच अवस्था संगीताची होणार काय, अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली होती. मात्र, देशाच्या कोनाकोपऱ्यातील नवोदित कलाकारांना शोधून त्यांना संधी देण्याचा ‘लोकमत’चा उपक्रम बघून माझी भीती दूर झाली आहे. लोकमत केवळ संगीत पुरस्कार देत नाही, तर खासदारापासून ते सरपंचांपर्यंत सर्वांना पुरस्कार देऊन उत्साह वाढविण्याचे काम करीत आहे, असेही ते म्हणाले.
नृत्याचाही समावेश करावा
प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंग म्हणाल्या की, आपल्याला एकच मनुष्य जीवन मिळाले आहे. मग संगीत, वाद्य आणि नृत्याच्या रसात का डुबकी मारू नये? ‘लोकमत’कडून संगीत आणि वाद्यांची काळजी घेतली जाते. मात्र, आता नृत्याचाही समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा स्वर्गातून हा कार्यक्रम बघत असल्याचेही त्या म्हणाल्या. आजीवन संगीताची सेवा करणारे छन्नूलाल महाराज यांची अवस्था फार वाईट असून, त्यांच्यासाठी काही तरी करण्याची विनंती मानसिंग यांनी डॉ. दर्डा यांना केली.