चीनच्या तुलनेत भारताचं संरक्षण बजेट कमीच, तरीही राजनाथसिंह म्हणतात 'लय भारी'
By महेश गलांडे | Published: February 2, 2021 09:25 AM2021-02-02T09:25:25+5:302021-02-02T09:26:15+5:30
भारताला सध्याच्या परिस्थितीत चीनपासून मोठा धोका आहे. चीन दरवर्षी जवळपास २६१ अरब अमेरिकी डॉलर म्हणजेच १९ लाख कोटी रुपये खर्च करतो, तर भारत ७१ अरब अमेरिकेी डॉलर म्हणजेच ५ लाख कोटी रुपये खर्च करतो.
नवी दिल्ली - संसदेत सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात चीन आणि पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण तरतुदींमध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी ४ लाख ७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या वर्षी सात हजार कोटी रुपयांची वाढ झाली असली तरी देशाच्या संरक्षण गरजांच्या तुलनेत ही वाढ तुटपुंजी म्हणावी लागेल. कारण, सध्या लडाख सीमारेषेवर चीन आणि भारतादरम्यान वारंवार तणाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे, संरक्षण खात्याचं बजेट अजून वाढवणं गरजेचं होतं, असं मत निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. विशेष म्हणजे, चीनच्या संरक्षण बजेटच्या तुलनेत भारताचं बजेट खूप कमी आहे.
भारताला सध्याच्या परिस्थितीत चीनपासून मोठा धोका आहे. चीन दरवर्षी जवळपास २६१ अरब अमेरिकी डॉलर म्हणजेच १९ लाख कोटी रुपये खर्च करतो, तर भारत ७१ अरब अमेरिकेी डॉलर म्हणजेच ५ लाख कोटी रुपये खर्च करतो. देशाच्या संरक्षण बजेटमध्ये गेल्या वर्षी ४ लाख ७१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी ४ लाख ७८ हजार कोटींची तरतूद केली आहे. ३ लाख ४७ हजार कोटी हे सैन्यव्यवस्थेवर खर्च होणार आहे. व्यवस्था म्हणजे केवळ उपकरणे नाहीत, तर पेन्शन, पगार भत्ता याचाही समावेश आहे आणि उरलेला पैसा तिन्ही दलांना मिळणार आहे. त्यामुळे, संरक्षण व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन करावे लागेल, असे निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी म्हटलंय. दरम्यान, संरक्षण बजेटच्या अर्थकारणात पेन्शनचा उल्लेख केला नाही. हा पैसा दुसऱ्या क्षेत्रातून उभा केला जाईल.
I specially thank PM& FM for increasing the defence budget to 4.78 lakh cr for FY21-22 which includes capital expenditure worth Rs 1.35 lakh crore. It is nearly19 percent increase in Defence capital expenditure. This is highest ever increase in capital outlay for defence in 15yrs
— Rajnath Singh (@rajnathsingh) February 1, 2021
देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पात ४.७८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातील १.३५ लाख कोटी रुपये शस्त्रास्त्र खरेदीसाठी राखून ठेवण्यात येतील. मागच्या वर्षी भांडवली खर्च म्हणजे शस्त्रास्त्र खरेदीसाठी १.१३ लाख कोटी रुपये खर्च झाला. त्यात १९ टक्के वाढ करण्यात आली. यावर्षी महसुली खर्चासाठी २.१२ लाख कोटी रुपये, तर पेन्शनसाठी १.१५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षी अर्थसंकल्पात ४.७१ लाख कोटी रुपये होते. २०१९-२० मध्ये संरक्षणासाठी ४.३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लष्करासाठीच्या भांडवली खर्चात १९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलंय. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभारही सिंह यांनी मानले आहेत.
राहुल गांधींची टीका
राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर भारत-चीन सीमावादावरून टीका केली आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे. आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. पीआरसाठी पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यांच्याबरोबर फोटो काढतात. असे असताना संरक्षणाचे बजेट वाढवले का जात नाही? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.
भारत-चीन सीमेवर पुन्हा झटापट
भारत-चीन सीमेवर अलीकडेच पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यावरून अद्यापही लडाख सीमेवर अशांतता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी तसेच सैन्य पातळीवर नऊ बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. पँगाँग सरोवराच्या फिंगर फोरमधून चीन माघार घ्यायला तयार नाहीय. तोचा वादाचा मुख्य मुद्दा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चीनने पूर्व लडाख सीमेवरील काही भागांमध्ये अतिक्रमण केले आहे. यावरून भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष झाला. मात्र, भारताच्या शूर जवानांनी चीनचे आव्हान तितक्याच ताकदीने परतवून लावले.