भारताने पाडले टेहळणी करणारे पाकिस्तानचे ड्रोन, दुसऱ्यांदा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:33 AM2019-03-05T06:33:31+5:302019-03-05T06:33:43+5:30
राजस्थानमधील बिकानेर क्षेत्रात सीमेलगत भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० या विमानाने पाकिस्तानचे टेहळणी करणारे एक लष्करी ड्रोन पाडले.
नवी दिल्ली : राजस्थानमधील बिकानेर क्षेत्रात सीमेलगत भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० या विमानाने पाकिस्तानचे टेहळणी करणारे एक लष्करी ड्रोन पाडले. यासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्यात आले. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हे ड्रोन विमान भारतीय हद्दीत आल्याचा सुगावा रडार यंत्रणेमुळे सैन्यदलाला लागला होता. गेल्या सहा दिवसांत पाकिस्तानने भारतीय हद्दीत दुसऱ्यांदा ड्रोन पाठवून टेहळणी करण्याचा अयशस्वी
प्रयत्न केला. या आधी भारतीय हद्दीत कच्छ परिसरात २७ फेब्रुवारी रोजी शिरलेले पाकिस्तानी ड्रोनही हवाई दलाने पाडले होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये विलक्षण तणाव निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरमधील कारवायांबरोबरच पाकिस्तानने राजस्थान, गुजरातच्या सीमाभागातही भारताविरोधात हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्यावर हवाई दलाने करडी नजर ठेवलेली आहे.