पाककडून भारताची हेरगिरी
By admin | Published: July 11, 2015 11:56 PM2015-07-11T23:56:01+5:302015-07-11T23:56:01+5:30
वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
जोधपूर : वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भारतीय क्षेत्रात हेरगिरीची कुठलीही संधी या देशाचे सैनिक सोडत नाहीत. यासाठी यूएव्ही (मानवरहित विमान) किंवा कॅमेऱ्याचा वापर केला जातो.
सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक (राजस्थान फ्रंटियर) रवी गांधी यांनी शनिवारी ही धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी पाकतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर ही लुडबूड थांबली असली तरी काही भागांत अजूनही चिंताजनक परिस्थिती आहे. पाकिस्तानी रेंजर्स त्यांच्या गुप्तहेरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असावेत. अथवा अमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी करणारे रात्रीच्या अंधारात भारतीय हद्दीत घुसले असतील, असा अंदाज एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
भारत-म्यानमार सीमेवर प्रभावी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती पुढील काही हप्त्यांत आपला अहवाल सादर करणार असून, समितीच्या शिफारशींनुसार पाऊल उचलण्यात येईल, असे राजनाथसिंह म्हणाले.
चिनी तंत्रज्ञानाचा वापर...
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गेल्या एप्रिल महिन्यात सीमेलगत पाकिस्तानच्या क्षेत्रात १५० ते ४०० मीटर उंचावर एक तीव्र प्रकाशझोत बघितला होता. ते नेमके काय होते आम्हाला माहिती नाही; परंतु ते ड्रोन अथवा यूएव्ही असावे असे मानून आम्ही पाकिस्तानी रेंजर्ससमक्ष हा मुद्दा उपस्थित करून आक्षेप नोंदविला. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता; परंतु पुन्हा त्यांनी बाडमेर, जैसलमेर, बिकानेर आणि गंगानगरमध्ये अनेक ठिकाणी सीमेजवळ कॅमेरे बसविणे सुरू केले, असे गांधी यांनी सांगितले.
आक्षेपानंतर राजस्थान फ्रंटियरच्या सीमेवरून कॅमेरे हटविण्यात आले असले तरी अन्य फ्रंटियरच्या सीमेवर काही कॅमेरे अजूनही लागलेले आहेत. कॅमेरे बसविण्यासाठी १५ फूट उंच पोल उभारण्यात आले असून यासाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही कॅमेरे झुडपांमध्ये आहेत.