जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे खच्चीकरण
By admin | Published: April 27, 2017 02:08 AM2017-04-27T02:08:31+5:302017-04-27T02:08:31+5:30
कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या १० देशांमध्ये पैशाच्या दृष्टीने सर्वांत श्रीमंत असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा
नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या १० देशांमध्ये पैशाच्या दृष्टीने सर्वांत श्रीमंत असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) जागतिक क्रिकेटमधील दबदबा धोक्यात आला आहे. जागतिक क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियामक मंडळाच्या दुबईमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत सध्याची प्रशासकीय रचना आणि महसुलाचे वाटप यात आमूलाग्र बदल करण्याचे भारताला मारक ठरणारे ठराव मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आले.
विशेष म्हणजे पैसा आणि सत्ता या दोन्ही बाबतींत ‘बीसीसीआय’चे पंख छाटण्याचे हे काम याच ‘बीसीसीआय’चे पूर्वी अध्यक्ष राहिलेल्या शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखाली झाले. ‘आयसीसी’चे पहिले त्रयस्थ अध्यक्ष या नात्याने मनोहर यांच्याच अध्यक्षतेखाली दुबईतील ही बैठक झाली. ‘आयसीसी’चे एकूण १० पूर्ण सदस्य आहेत. बैठकीत प्रशासकीय रचनेत बदल करण्यासंबंधीचा ठराव एकटा भारत वगळून इतर सर्व सदस्य देशांच्या संमतीने म्हणजे १-९ अशा बहुमताने संमत झाला. भारताचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी एकट्यानेच ठरावाच्या विरोधात मतदान केले. महसुलाच्या वाटपाचे सूत्र बदलण्यासंबंधीचा ठरावही नियामक मंडळाने ८-२ अशा बहुमताने मंजूर केला. भारताच्या चौधरींसोबत श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या तिलंगा सुमतीपाला यांनी ठरावास विरोध केला.
महसूल वाटपाच्या प्रचलित सूत्रानुसार भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना सर्वाधिक वाटा मिळत आला आहे. त्याऐवजी सर्व सदस्य देशांना समन्यायी वाटप करण्याच्या नव्या सूत्राचा पर्याय मनोहर यांनी मांडला होता. तो बहुमताने मंजूर झाला. यामुळे ‘बीसीसीआय’चा महसुलातील वाटा ५७० दशलक्ष डॉलरवरून त्याच्या निम्म्यावर येणार आहे.
मंजूर झालेल्या प्रशासकीय बदलांमुळे ‘आयसीसी’च्या घटनेत सुधारणा करावी लागेल, पूर्ण आणि सहयोगी सदस्यत्वाचा फेरआढावा घेतला जाईल आणि कसोटी क्रिकेटही द्विस्तरीय होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीपुढे प्रश्नचिन्ह
आजच्या या घडामोडीनंतर यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाच्या सहभागापुढील प्रश्नचिन्हही कायम राहिले आहे. संघ निवडून तो जाहीर करण्याची मुदत मंगळवारी संपली तरी भारतीय संघ जाहीर केला गेलेला नाही. मग आता भारत या स्पर्धेत खेळणार नाही का, असे विचारता मंडळाचा हा अधिकारी म्हणाला की, आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. आयसीसीने आधी ठरलेल्या स्पर्धेतील सहभागाविषयीच्या कराराचे पालन केलेले नाही. (वृत्तसंस्था)
पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा-
आजच्या बैठकीत काय भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्यांच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. त्यात बैठकीला जाणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधीला दोन पर्याय मंजूर करण्यात आले होते. पहिला म्हणजे, या दोन्ही विषयांवरील निर्णय पुढे ढकलण्याची विनंती करणे आणि दुसरा, तरीही मतदान झालेच तर दोन्ही मुद्द्यांवर विरोधी मतदान करणे.
त्यानुसार आमच्या प्रतिनिधीने निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केली. ती अमान्य झाल्यावर दोन्ही ठरावांवर विरोधी मतदान केले. आता पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात आजच्या या निर्णयांची माहिती देऊन पुढे काय करायचे यावर विचार केला जाईल, असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
मनोहर हेच व्हिलन
बीसीसीआयच्या सध्याच्या प्रशासनाला पाण्यात पाहणारे शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष असल्याने आम्हाला विरोध अपेक्षित होता. पण झिम्बाब्वे व बांगलादेश या दोन देशांनी आश्वासन देऊनही पाठिंबा दिला नाही याचे आश्चर्य वाटते.
- बीसीसीआय पदाधिकारी