मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:59 AM2018-05-08T05:59:44+5:302018-05-08T05:59:44+5:30
शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.
बंगळुरु - शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.
कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने डॉ़ सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आमचे इरादे साफ असल्याचे मोदी सरकार सांगते, पण त्यांच्या निर्णयांना व धोरणांना तर्कसंगती नाही़ नेमके काय घडते, याचे विश्लेषण करण्याची तयारी नसल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे.
डॉ. सिंग म्हणाले की, देश सध्या बिकट कालखंडातून जात आहे. शेतकरी संकटात आहेत, तरुण पिढीला नोकऱ्यांच्या संधी नाहीत आणि अर्थव्यवस्थेचा विकास क्षमतेहून कमी दराने होत आहे. हे टाळता येण्यासारखे होते तरी टाळले गेले नाही. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याऐवजी चुका व त्रुटी दाखविणाºयांची तोंडे बंद करण्याची सरकारची वृत्ती आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने लहर व मर्जीनुसार काम न करता काळजीपूर्वक धोरणे राबविणे गरजेचे असते, अशी टीकाही डॉ़ सिंग यांनी केली़
हे सरकार अर्थव्यवस्था जोमात असल्याचे फसवे चित्र रंगविते. ‘संपुआ’ सरकारच्या काळात जगभरात प्रतिकूल परिस्थिती असूनही विकासदर सरासरी ७ टक्के राहिला होता व एकदा तर तो ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. (वृत्तसंस्था)
मोदींनी पातळी सोडली
मोदींनी पातळी सोडून प्रचार केल्याने पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आल्याची टीकाही डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. ते म्हणाले की, प्रचारात मोदी ज्या प्रकारची विधाने करीत आहेत, तशी आजवर कोणाही पंतप्रधानाने केलेली नाहीत. ते समाजाचे जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करू पाहात आहेत, पण याने कर्नाटकचे किंवा देशाचे भले होणार नाही. मोदी यावरून काही धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.
शहाणपणाची मक्तेदारी तुमच्याकडेच नाही!
सर्व शहाणपणाची मक्तेदारी एकट्या माझ्याकडे आहे, असे कोणी म्हणू शकत नाही. देशाचा घात करणाºया कोणत्याही धोरणाचा सरकारला जाब विचारल्यास उलट जाब विचारणाºयाचा हेतूच विखारी असल्याचे उत्तर मिळते.
जनमत चाचणी : काँग्रेसला सर्वाधिक जागा
जनता दल (सेक्युलर) ठरणार किंगमेकर
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा निष्कर्ष लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या जनमत चाचणीत निघाला आहे. जनता दल (सेक्युलर)च्या मदतीशिवाय कोणालाही सरकार बनविता येणार नाही, असेही या चाचणीत म्हटले आहे.
२२५ पैकी किती जागा
काँग्रेस 97
भाजपा 84
जेडीएस 37