भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:31 PM2023-08-18T14:31:36+5:302023-08-18T14:32:00+5:30
एकूण ११०० चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. हे केवळ कमी वेळातच नव्हे तर कमी खर्चातही बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रिंटरच्या सहाय्याने सामान्यतः कागदावर मुद्रण केले जाते, परंतु आधुनिक टेक्नॉलॉजीने ते एका नवीन स्तरावर पोहोचले आहे. कागदावर शब्द आणि फोटोच्या प्रिंटनंतर आता भारतात संपूर्ण बिल्डिंग प्रिंट करून उभी करण्यात आली आहे.
प्रिंटिंगच्या जगात भारताने पहिल्यांदाच हा नवा विक्रम केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून शेअर केला आहे, ज्यामध्ये बिल्डिंग 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीने तयार होताना दिसत आहे. प्रिंटिंगचे नवीन टेक्निकल वापरून पोस्ट ऑफिसची बिल्डिंग तयार करण्यात आली आहे.
बंगळुरू येथील केंब्रिज लेआउटमध्ये असलेली ही बिल्डिंग रेकॉर्ड ४४ दिवसांत प्रिंट होऊन तयार झाली आहे. खुद्द केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या 3D पोस्ट ऑफिसचे बांधकाम २१ मार्च रोजी सुरू झाले आणि ३ मे रोजी पूर्ण झाले. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे ते इतक्या कमी वेळात तयार होऊ शकले.
The spirit of Aatmanirbhar Bharat!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 18, 2023
🇮🇳India’s first 3D printed Post Office.
📍Cambridge Layout, Bengaluru pic.twitter.com/57FQFQZZ1b
या बिल्डिंगचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, बंगळुरूने नेहमीच देशाचे एक नवे चित्र सर्वांसमोर आणले आहे. ते पुढे म्हणाले, "तुम्ही या 3D प्रिंट पोस्ट ऑफिस बिल्डिंगचे जे नवीन चित्र पाहिले, ते आज भारताची भावना आहे. याच भावनेने भारत आज प्रगती करत आहे."
दरम्यान, बंगळुरूमध्ये बांधलेल्या या बिल्डिंगला केंब्रिज लेआउट पोस्ट असे नाव देण्यात आले आहे. एकूण ११०० चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. हे केवळ कमी वेळातच नव्हे तर कमी खर्चातही बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कसे काम करते 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी?
थ्रीडी प्रिंटिंगच्या या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे, ड्रॉइंग इनपुटवर थर-बाय-लेयर काँक्रीट ओतले जाते. ज्या ठिकाणी बिल्डिंग बांधायची आहे, त्या ठिकाणी त्या मशीनला असेंबल केले जाते.