केरळमध्ये आढळला देशातील पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण; महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी चीनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:29 AM2020-01-31T06:29:03+5:302020-01-31T06:29:41+5:30

दिल्लीत ज्या तिघांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

India's first corona virus patient found in Kerala; Many students from Maharashtra in China | केरळमध्ये आढळला देशातील पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण; महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी चीनमध्ये

केरळमध्ये आढळला देशातील पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण; महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी चीनमध्ये

Next

नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्याने देशात घबराट पसरली आहे. वुहान विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी केरळमध्ये परतल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत दाखल केलेल्या सहापैकी तिघांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिल्लीत ज्या तिघांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मुंबईच्या दहिसरमधील एका तरुणाला गुरुवारी कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अन्य देशांतून शांघायमार्गे भारतात आला आहे, असे सांगण्यात आले. मुंबईसह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होत आहे.
दरम्यान, चीनमधील सर्व भारतीयांना विमानाने उद्या, शुक्रवारी भारतात आणण्यात येणार आहे. त्यासाठी त्या सर्वांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. वुहानमध्ये अन्नपाण्याचा तुटवडा जाणवत असल्याची तक्रार काही भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे.
केरळमध्ये सहा जणांची रक्ततपासणी झाली होती. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. केरळमधील सुमारे ८०० जणांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४,७९० रुग्णांची तपासणी केली. परंतु अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही, अशी माहिती गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. चीनमध्ये महाराष्ट्रातील ७ विद्यार्थी अडकले असून, त्यांना बाहेर कुठेही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पालक चिंतेत असून भारतीय दूतावासाच्या मदतीने त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमधल्या वुहान शहरातील हुबे विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी पुणे, नांदेड, गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील आमगावचे तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली हीदेखील चीनमध्ये शिकत आहे. सोनालीसोबत भद्रावती (चंद्रपूर) येथील एक मुलगी तिथे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला आहे. त्या दोघींचे पालक सध्या अतिशय चिंतेत आहेत.
दयाराम भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या विद्यार्थ्यांना सध्या बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. सोनालीशी आम्ही रोज फोनवर बोलत आहोत. मुलीला भारतात परत आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडेही मेल पाठवला आहे. चीनमधील भारतीय दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, पण चीन सरकारने त्यांना अद्याप बाहेर पडण्यास परवानगी दिलेली नाही. ती मिळाल्यानंतर सोनालीसह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी दिल्ली वा मुंबईमार्गे परत येतील.

भद्रावतीतील युवती येणार परत
हुबई प्रांतात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील भाग्यश्री ऊके अडकली आहे. दूतावासाने तिला भारतात येण्यास परवानगी दिली आहे. तेथील प्रत्येकाला जेवणाची वेळ सोडली तर २४ तास मास्क लावूनच राहावे लागत आहे, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.

अकोल्याचे १४ विद्यार्थी परतले
अकोल्यातील १४ विद्यार्थीही गेल्या काही दिवसांत अकोल्यात परतले आहेत. त्यांची चार वेळा वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती चीनमधून परतलेल्या अकोल्यातील गिरिजा खेडकर या विद्यार्थिनीने ‘लोकमत’ला दिली.

Web Title: India's first corona virus patient found in Kerala; Many students from Maharashtra in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.