अमरावती ते विजयवाडा फक्त पाच मिनिटांमध्ये भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 01:09 PM2017-09-07T13:09:38+5:302017-09-07T13:16:48+5:30
आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत.
मुंबई, दि ७- आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत. सर्वात गतिमान वाहतूक करणा-या या सेवेमुळे दोन्ही शहरांमध्ये केवळ पाच मिनिटांचे अंतर राहणार आहे. नवी राजधानी सर्व आधुनिक सेवांनी आणि सोयींनी युक्त असावी असा मानस असणा-या आंध्र सरकारने नुकताच यासाठी अमेरिकन कंपनीशी करार केला आहे.
जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारतातील तो पहिला हायपरलूप प्रकल्प मानला जाईल. देशातील इतर राज्यांमध्ये आता कोठे मेट्रो प्रकल्पाची पहाट होत असताना आंध्र प्रदेशाने इतर राज्यांना मागे टाकत अशी झेप घेतली आहे. हायपरलूपची संकल्पना एलन मस्क यांनी सर्वप्रथम अमेरिकेत मांडली, मात्र आजवर ती कोठेही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही.
आंध्र प्रदेश राज्याचे आर्थिक विकास मंडळ आणि अमेरिकास्थित हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नाँलजी ( एचटीटी) यांच्यामध्ये झालेल्या करारात या हायपरलूप प्रकल्पाची निश्चिती करण्यात आली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, अजून याला किती खर्च येईल हे जाहीर करण्यात आलेले नाही.
हायपरलूप एखाद्या ट्यूबसारखे असून त्यामध्ये होणारी वाहतूक अत्यंत वेगाने होते, अनेक देशांमध्ये अजूनही ही व्यवस्था प्रयोगाच्या व चाचणीच्या पातळीवरच विकसित झालेली आहे. स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकाँनाँमिक फोरममध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एचटीटीच्या अधिका-यांशी यावर चर्चा केली नंतर त्याच्या सिद्धतेबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर एचटीटीचे अध्यक्ष बिशप गेस्टा आणि आंध्र आर्थिक विकास मंडळाचो मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण किशोर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याक आला.
या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पामुळे अमरावती आणि विजयवाडा हे ३५ किमीचे अंतर पाच मिनिटांमध्ये पार करता येईल. सहा महिन्यांच्या फिजिबिलिटी स्टडीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पास सुरुवात होईल व भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प आम्ही बांधू असा विश्वास बिशप यांनी व्यक्त केला आहे. एचटीटी आंध्र विकास मंडळ आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास डाईल असा विश्वास कृष्ण किशोर यांनी व्यक्त कोला आहे.