बंगळुरूत बनली भारताची पहिली चालकरहित कार
By admin | Published: March 17, 2016 04:56 AM2016-03-17T04:56:14+5:302016-03-17T04:56:14+5:30
बंगळुरू येथील सॉफ्टवेअर तांत्रिक तज्ज्ञ रोशी जॉन एकदा विमानतळावरून टॅक्सीने घरी जात असताना झोपेच्या डुलक्या घेणाऱ्या चालकाने वाहन दुसऱ्या वाहनावर जवळजवळ धडकवले होते.
चेन्नई : बंगळुरू येथील सॉफ्टवेअर तांत्रिक तज्ज्ञ रोशी जॉन एकदा विमानतळावरून टॅक्सीने घरी जात असताना झोपेच्या डुलक्या घेणाऱ्या चालकाने वाहन दुसऱ्या वाहनावर जवळजवळ धडकवले होते. त्यानंतर जॉन स्वत: टॅक्सीचा ताबा घेत घरी पोहोचले, पण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येण्याचा हा प्रसंग ते विसरू शकले नाहीत. पाच वर्षांनी त्यांनी मित्रांच्या मदतीने ‘टाटा नॅनो आॅटोनॉमस’ ही देशातील पहिली चालकरहित कार विकसित करीत एका स्वप्नाची पूर्तता केली आहे.
जॉन हे टीसीएसमध्ये रोबोटिक यंत्रणेचे प्रमुख असून त्यांनी आपल्या २९ सदस्यांच्या चमूसह ही कार तयार केली आहे. ३ डी मॉडेल असलेल्या या कारची अद्याप रस्त्यावर पूर्ण चाचणी व्हायची आहे. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांची परवानगी हवी आहे. (वृत्तसंस्था)
अशी झाली कार तयार...2011 मध्ये जॉन यांनी टाटा नॅनो कार खरेदी केली. जगभरात निस्सान, जनरल मोटर्स, बीएमडब्ल्यू, गुगल आणि टेल्सा यासारख्या कार कंपन्यांनी ड्रायव्हरविना चालणाऱ्या कारचा विकास करण्यासाठी गुंतवणूक चालविली असताना जॉन यांनी नॅनोची निवड केली. गुगलच्या स्वयंचलित कारने कॅलिफोर्नियात एका सार्वजनिक बसला धडक दिल्याची बातमी अलीकडेच चर्चेचा विषय ठरली असताना जॉन यांच्या कारची चर्चा जोर धरू शकते.
अनेकांनी घेतला संशय
मे २०१२ मध्ये जॉन यांच्या स्वयंचलित कारने बंगळुरूच्या रस्त्यावर पहिली धाव घेतली होती. हा अनुभवही त्यांच्यासाठी अनोखाच ठरला.
पोलीस वारंवार चौकशी करायचे. कॅमेरे आणि आतील अनेक संगणकांबद्दल संशय व्यक्त करायचे.
अन्य कामांची जबाबदारी असताना या प्रकल्पासाठी वेळमर्यादाही पाळायची होती, असे त्यांनी सांगितले.