मोदींच्या संकल्पासाठी तरूणांनी पुढं यावं, देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं - गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:03 PM2024-01-31T17:03:03+5:302024-01-31T17:04:05+5:30
भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने देशातील तरूणाईला एक आवाहन केले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे गंभीरने आवाहन केले. तो त्याच्या दिल्ली पूर्व या लोकसभा मतदारसंघात 'नमो न्यू व्होटर्स कॉन्फरन्स'ला संबोधित करताना बोलत होता. युवा मतदार हा देशाच्या चांगल्या भविष्याचा पाया रचेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
तसेच संपूर्ण जगात सर्वाधिक युवा मतदार हा भारतात आहे. भारत ७ लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा आकार गाठेल कारण लोक आता विकासाबद्दल भाष्य करत असून पूर्वी झालेल्या घोटाळ्यांच्या चर्चा होत आहेत, ते उघडकीस येत आहेत. भारतातील तरुण देशाचे आणि जगाच्या मोठ्या भागाचे भविष्य ठरवतील यात शंका नाही. देशाच्या निर्णय प्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समस्या आपल्याच असतील तर त्यावर तोडगा देखील आपणच काढायला हवा, असे गंभीरने नमूद केले.
यावेळी गौतम गंभीरने पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या युवा मतदारांना पदक देऊन सन्मानित केले. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तो समालोचनाकडे वळला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे. गंभीर आयपीएल २०२४ मध्ये केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसेल.
'आप'वर गंभीरची टीका
गौतम गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा दाखला देत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला लक्ष्य केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केवळ मतांसाठी राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली. दिल्ली सरकारच्या सोलर पॉलिसीबद्दल गंभीर म्हणाला की, अरविंद केजरीवाल फक्त मतांचे राजकारण करतात. वीज आणि पाण्यानंतर आता ते सोलरवर बोलत आहेत, हे सर्व फक्त मतांसाठी सुरू आहे. जोपर्यंत व्होट बँकेचे राजकारण आहे, तोपर्यंत दिल्लीतील जनता प्रदूषणाशी अशीच झुंज देत राहणार आहे. व्होट बँकेचे राजकारण असेल तर दिल्ली आणि देशाचा विकास होणार नाही.