"आमच्याकडे देशातील वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे...", सचिननं सांगितली भारताची 'ताकद'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:00 PM2023-08-23T14:00:52+5:302023-08-23T14:01:43+5:30
भारतीयांच्या लाडक्या सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' म्हणून देखील ओळखलं जाणार आहे.
नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिनची जगभर ख्याती आहे. आता भारतीयांच्या लाडक्या सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' म्हणून देखील ओळखलं जाणार आहे. सचिन तेंडुलकरलानिवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन बनवण्यात आलं आहे. अधिकाधिक लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करणं ही सचिनची जबाबदारी असेल. राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीत सचिनला ही नवी जबाबदारी देण्यात आली. तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात दिल्लीत सामंजस्य करार झाला. तीन वर्षांच्या करारांतर्गत तेंडुलकर मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम करेल. यावेळी बोलताना क्रिकेटच्या देवानं भारताची ताकद सांगताना ड्रेसिंग रूममधील आठवणींना उजाळा दिला.
आमच्याकडे देशाच्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे खेळाडू होते आणि ते सगळे ड्रेसिंग रूममध्ये होते. पण, तीच आमची ताकद होती, असे सचिननं सांगितलं. तसेच एक भारतीय म्हणून मी लोकांना सांगू इच्छितो की भारत हे जगातील सर्वाधिक युवा असलेलं राष्ट्र आहे. याशिवाय मतदानाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात जबाबदार राष्ट्र देखील आहे, असंही सचिननं नमूद केलं.
VIDEO | "We had players from different parts of the country, different religions, different caste, different cultures, and they were all there in the dressing room. But that was our strength," says @sachin_rt at the ceremony where he is being recognised as the 'national icon' of… pic.twitter.com/lquwr3NMai
— Press Trust of India (@PTI_News) August 23, 2023
आगामी लोकसभा निवडूक २०२४ च्या तयारीसाठी निवडणूक आयोग कामाला लागलं आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगानं एका निवेदनात म्हटलं, "आगामी निवडणुकांमध्ये खासकरून २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी युवकांमधील तेंडुलकरच्या प्रभावाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असेल." दरम्यान, मागील वर्षी निवडणूक आयोगानं अभिनेता पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. आता यावेळी क्रिकेटचा महान भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.