भारतीयांचे हात पिवळे करण्याचे वय वाढले!
By admin | Published: April 29, 2015 11:41 PM2015-04-29T23:41:51+5:302015-04-29T23:41:51+5:30
भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत.
नवी दिल्ली : भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत. यामुळे प्रजनन दरातही लक्षणीय घट नोंदली गेली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. २०११ च्या जनगणना अभ्यासात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
२००१ आणि २०११ च्या जगणनेचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या काळात महिलांच्या लग्नाचे किमान वय १८.३ वरून वाढून १९.३ वर्षे झाले आहे. तसेच पुरुषांचे वयही २२.६ वरून २३.३ वर्षे झाले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे कधीकाळी बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारला लग्नाकरिता किमान वयाचा कायदा आणावा लागला होता.
अहवालात म्हटले आहे की, पुरुष आणि महिला, दोन्हींमध्ये घटस्फोट आणि वेगळे झालेल्या दाम्पत्यांच्या प्रमाणात अंशत: वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत ४९.९ टक्के एवढे नोंदले गेले. २००१ मध्ये हे प्रमाण ४७.७ टक्के होते, असे वैैवाहिक स्थितीसंदर्भातील आकडेवारीत म्हटले आहे. पुरुषांबाबत हे प्रमाण २०११ मध्ये ४६.० टक्के, तर २००१ मध्ये ४३.६ टक्के होते.
भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे हा अभ्यास अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, प्रजनन दरातही घट नोंदली गेली आहे. २०११ मध्ये मुलांचा लिंगनुपात २००१ च्या तुलनेत सर्वच वयोगटात कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युवकांच्या वयोगटात विशेषत: २० वयाखालील मुलांच्या लिंगदरात मोठी घट झाली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
४या काळात सर्वच वयोगटांतील भारतीयांच्या आयुष्यमानात वाढ झाली आहे. १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये घटला आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण प्रजनन दर २००१ ते २०११ या काळात २.५ टक्क्यांवरून घटून २.२ झाला आहे.
४विधवा महिलांचे प्रमाण २००१ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये ७.४ टक्के झाले. विधुरांचे प्रमाण १.८ टक्क्यांवरून २.० टक्के झाले.