भारताची आयआयटी आता टांझानियातही; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:08 AM2023-07-07T06:08:08+5:302023-07-07T06:08:23+5:30
भारतीय नौदलाचे जहाज ‘त्रिशूल’ सध्या टांझानियामध्ये आहे.
नवी दिल्ली/झांझिबार : भारताबाहेर परदेशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) झांझिबार-टांझानिया येथे स्थापन केली जाईल आणि त्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी हा करार झाला. तसेच भारतीय नौदलाचे जहाज ‘त्रिशूल’ सध्या टांझानियामध्ये आहे.
झांझिबार-टांझानियामध्ये आयआयटी मद्रासचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी भारताचे शिक्षण मंत्रालय, आयआयटी मद्रास आणि टांझानियाचे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण मंत्रालय यांच्यात ५ जुलैला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी झांझिबारचे अध्यक्ष डॉ. हुसेन अली मिविनी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. आयआयटी मद्रासचा हा प्रस्तावित कॅम्पस भारताबाहेरील आयआयटीचा पहिला कॅम्पस असेल.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर
परराष्ट्र मंत्री जयशंकर बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर झांझिबारला पोहोचले. राष्ट्रपती डॉ. हुसेन अली मिविनी यांच्यासमवेत भारतीय नौदल जहाज ‘त्रिशूल’च्या स्वागत समारंभात ते सहभागी झाले. यावेळी जयशंकर म्हणाले, येथील आयएनएस त्रिशूलची उपस्थिती शांतता प्रस्थापित करेल. त्यातून प्रदेशातील समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारताची वचनबद्धता दिसते. दरम्यान, या भेटीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.