भारताचा इस्त्रायलबरोबरचा क्षेपणास्त्र खरेदी करार फिस्कटला, पाकिस्तानकडे जास्त रेंजची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 01:21 PM2017-11-21T13:21:13+5:302017-11-21T16:10:18+5:30
भारताने इस्त्रायलसोबत केलेल्या क्षेपणास्त्र खरेदीच्या करारातून माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचा खरेदी करार झाला होता.
नवी दिल्ली - भारताने इस्त्रायलसोबत केलेल्या क्षेपणास्त्र खरेदीच्या करारातून माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचा खरेदी करार झाला होता. भारताने या करारातून अंग काढून घेतल्याने लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेला झटका बसला आहे. संरक्षण मंत्रालय डीआरडीओकडे स्वदेशी बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवणार आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानकडे जास्त मारक क्षमतेची रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहेत. पाकिस्तानकडे त्यांच्या इन्फॅन्ट्री सैनिकांसाठी रणगाडा विरोधी पोर्टेबल क्षेपणास्त्रे आहेत. भारतीय रणगाडे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असताना तसेच बंकर्सना पाकिस्तानी क्षेपणास्त्रे सहज लक्ष्य करु शकतात.
भारताकडे असलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची रेंज फक्त दोन किलोमीटर आहे. एनडीटीव्ही खबरने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. रणगाडा विरोधी स्पाइक क्षेपणास्त्राचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना भारताने या करारातून अंग काढून घेतले. भारताने स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला आहे. भारत जी क्षेपणास्त्र इस्त्रायलकडून विकत घेणार होता. तशाच क्षेपणास्त्रांची देशांतर्गत निर्मिती करायची आहे. जेणेकरुन शस्त्रास्त्रांची आयात कमी होईल.
स्ट्रॅटजिक पार्टनरशिप धोरणातंर्गत मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीला भारत सरकारने प्राधान्य दिले आहे. स्पाइक क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते आपणहून टार्गेटचा पाठलाग करते. इस्त्रायलच्या राफेल अॅडवान्स डिफेंस सिस्टिम्सने स्पाइकची निर्मिती केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडे चिनी बनावटीचे एचजे-8 क्षेपणास्त्र आहे. भारताकडच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत एचजे-8 ची मारकक्षमता दुप्पट आहे. पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीची TOW क्षेपणास्त्र सुद्धा आहे. एचजे-8 पेक्षा या क्षेपणास्त्राची ताकत जास्त आहे.
संपूर्ण जग येईल चीनच्या नव्या अण्वस्त्राच्या टप्प्यात
जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने म्हटले आहे. सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’च्या बातमीनुसार हे क्षेपणास्त्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘रॉकेट फोर्स’ या क्षेपणास्त्र दलात सन २०१८च्या पूर्वार्धात दाखल होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते ‘डीएफ-४१’ कदाचित याआधीच लष्करात दाखल होऊन ते अधिक अचूक करण्यासाठी त्याच्या चाचण्या घेतल्या जात असाव्यात.