भारतातील सर्वात मोठ्या रस्ते आणि रेल्वेपुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 01:02 PM2018-05-10T13:02:15+5:302018-05-10T13:02:15+5:30
हा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे.
बोगीबील (आसाम)- भारतातील सर्वात मोठ्या रस्ता आणि रेल्वेपुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे.
या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै महिन्यामध्ये सर्व काम पूर्ण होईल. या 4.94 किमी लांबीच्या पुलाचे आता केवळ
विद्युतीकरण आणि सिग्नलिंगचे काम होणे बाकी आहे. यावर्षाच्या आखेरीस या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. यापुलाच्या वरच्या भागात रस्त्याच्या तीन मार्गिका आहेत तर खालच्या बाजूस रेल्वेचे दोन मार्ग आहेत.
ब्रह्मपुत्रेवर बांधला जाणारा हा पुल तिच्या प्रवाहापासून 32 मी उंचीवर आहे. स्वीडन आणि डेन्मार्क यांना जोडणाऱ्या पुलाप्रमाणे याची रचना आहे. चीनच्या सीमेवर तैनात असणाऱ्या लष्करी फौजांना तेजपूर येथून पाठविल्या जाणाऱ्या साहित्य़ाची वाहतूक आता कमीत कमी वेळात होणार असून याचा अरुणाचल प्रदेश राज्याला मोठा फायदा होणार आहे.
आतापर्यंत आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोगीघोपास हा बोंगाईगॉव जिल्ह्यातील पूल, गुवाहाटी जवळचा सराइंघाट पूल आणि कोलिया भोमोरा हे पूल जोडत असत. त्यामुळे ब्रह्मपुत्रा ओलांडून माल अरुणाचलप्रदेशला जाण्यासाठी 600 किमी प्रवास करावा लागत असे. फेरीबोटीने ब्रह्मपुत्रा ओलांडायची झाल्यास जड सामानाची वाहतूक करता येत नसे तसेच मे पासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाळ्यामुळे वाहतूक करता येत नाही.