नेपाळमध्ये भारताची विशाल मदत मोहीम
By admin | Published: April 27, 2015 12:48 AM2015-04-27T00:48:32+5:302015-04-27T00:48:32+5:30
भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित
नवी दिल्ली : भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित कर्मचारी सेवेत दाखल केले आहेत. नेपाळमधील स्थिती ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे भारताने म्हटले आहे.
भूकंपानंतर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांसाठी सद्भावना व्हिसा सुविधा जारी करण्यात आली आहे. पीडितांना हवाई मार्गासह रस्ते मार्गाने काढण्यासाठी बसेस आणि रूग्णवाहिकांचीही मदत घेतली जात आहे. शनिवारी १,००० लोकांना हवाई मार्गे बाहेर काढण्यात आले.
भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील स्थिती आणखी गंभीर बनू शकते. कारण येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येऊ शकतात. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठीत आंतर-मंत्रालयीने पथक लवकरच नेपाळला रवाना होणार असून ते तेथील मदत आणि बचाव कार्यात समन्वय ठेवेल.
जयशंकर पुढे म्हणाले की, नेपाळमध्ये लवकरात लवकर मदत आणि बचाव कार्य मोहिम राबविणे हा आमच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दा आहे. नेपाळमधील स्थिती खूप गंभीर आहे. यावेळी गृह सचिव एल. सी. गोयल, संरक्षण सचिव आर. के. माथूर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख आर. के जैन आणि भारतीय हवामान विभागाचे प्रमुख एल. एस. राठोड हेही उपस्थित होते. गृहसचिवांनी सांगितले की, भूकंपोत्तर धक्क्यांनी आतापर्यंत भारतात ६२ जण मृत्युमुखी, तर २५९ जण जखमी झाले आहेत.