भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था विश्वासार्ह अन् सुरक्षेची प्रक्रियाही उच्च प्रकारची- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:04 AM2022-03-16T10:04:30+5:302022-03-16T10:05:02+5:30
क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले.
नवी दिल्ली : भारताची क्षेपणास्त्र व्यवस्था ही खूप विश्वासार्ह आणि सुरक्षेची प्रक्रियाही अतिशय उच्च प्रकारची असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले. क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेल्याची घटना ही खेदजनक असल्याचे ते म्हणाले. क्षेपणास्त्र हाताळण्याची प्रमाणित आणि त्याची देखभाल करण्याच्या पद्धतीचा आढावा घेतला जात असून, काही दोष आढळल्यास ते तत्काळ दूर केले जातील, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
भारताची भूमिका अपूर्ण - कुरेशी
भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागले गेल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत मांडलेली भूमिका ही ‘अपूर्ण’ आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताचे म्हणणे फेटाळले. त्या घटनेच्या संयुक्त चौकशीची मागणी कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा केली. मंत्री सिंह यांनी लोकसभेत जे सांगितले ते पाकिस्तानचे समाधान करणारे नाही, असे ते म्हणाले. क्षेपणास्त्र डागले जाणे हे कमालीचे बेजबाबदारपणाचे आहे.
अन्य कारण सूचित होत नाही - अमेरिका
भारतातून ९ मार्च रोजी पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र हे अपघाताशिवाय अन्य कोणत्याही कारणांनी होते असे सूचित होत नाही, असे अमेरिकेने म्हटले. भारताने शुक्रवारी म्हटले की, “भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात अपघाताने पडले आणि त्याबद्दल तीव्र खेद होतोय. ती घटना तांत्रिक दोषामुळे घडली.” अपघाताशिवाय दुसऱ्या काेणत्याही कारणाने तो प्रकार घडलेला नाही हे भारतानेही म्हटले आहे. आमच्याकडे त्याशिवाय दुसरे काही सूचित करणारे नाही.