भारताची चाल ठरली निर्णायक : फौजांनी केली महिनाभरापासून नियोजनबद्ध तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:03 AM2020-09-14T01:03:09+5:302020-09-14T06:08:40+5:30
हटवादी चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरणार आहे, हे गृहीत धरूनच भारताने ही चाल केली होती. ती निर्णायक ठरली.
नवी दिल्ली : लड्डाख सीमेवरील चीनच्या आक्रमक विस्तारवादाला शह देण्यासाठी भारतीय फौजांनी तब्बल महिनाभरापासून तयारी केली होती. अतिशय नियोजनबद्ध केलेल्या या कारवाईमध्ये पँगाँग तलावाजवळील सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या शिखरांवर भारतीय फौजांनी ताबा मिळवला. भारताच्या या मुसंडीने चीनही हबकला. हटवादी चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरणार आहे, हे गृहीत धरूनच भारताने ही चाल केली होती. ती निर्णायक ठरली.
चीनच्या विस्तारवादाला शह देण्यासाठी भारताने २९-३० आॅगस्टला पँगाँग सरोवराच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या डोंगरांवर ताबा मिळवला. या कारवाईमुळे रेझान्ग लापर्यंत चिनी फौजांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबर त्यांना भारतीय तोफांच्या माऱ्याखाली आणणे शक्य झाले. भारतीय फौजांची चाल चीनविरोधात निर्णायक ठरली. यामुळे चिनी फौजा खºया अर्थाने माघारी फिरल्या. भारतीय सेनेने चीनच्या विरोधात या कारवाईला प्रतिबंधात्मक कारवाई संबोधले.
३० जूनला झालेल्या ध्वज बैठकीत सैन्य माघारी घेण्यासंदर्भात चीनने होकार दर्शवला होता. मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही फौजा मागे घेतल्या नाहीत. या कारवाईची माहिती मोजक्याच अधिकाऱ्यांना होती. कारवाईसाठी अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. यात इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, स्पेशल फ्रंटिअर फोर्स आणि भारतीय लष्कर, असे पर्याय ठेवण्यात आले होते. शेवटी स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले. या कारवाईमुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप तसेच मॉल्डो येथील शिखरांवर ताबा मिळवता आला.