...तेव्हा भारताची नऊ मिसाईल सज्ज होती; अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:07 PM2019-03-23T12:07:26+5:302019-03-23T12:15:46+5:30
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार रहावं असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता
नवी दिल्ली - विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार रहावं असा इशारा भारतानेपाकिस्तानला दिला होता. 27 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तानविरुद्ध मिसाईल युद्ध करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्णय देखील घेतला होता. पाकिस्तानकडूनही हल्ला केल्यास चोख उत्तर देऊ असं सांगण्यात आलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आमच्या ताब्यात आहे असं पाकिस्तानने घोषित केलं त्यावेळी भारताने पाकिस्तानला हा इशारा दिला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या एफ 16 या विमानाचा पाठलाग करत पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले होते. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग 21 विमान तांत्रिक कारणामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं होतं. पॅरोशूटच्या माध्यमातून अभिनंदन वर्धमान जमिनीवर आले तेव्हा पाकिस्तानमधील स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं. यानंतर पाकिस्तान सैन्यांनी अभिनंदन यांना कैद केले होते. एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारत आणि पाकिस्तानमधील नेते एकमेकांना आव्हान देण्याची भाषा करत होते. मात्र पडद्यामागे रॉ चे अधिकारी अनिल धस्माना आणि पाकिस्तान इंटर सर्विसेज इंटेलिजेंसचे प्रमुख लेफ्टनंट असीम मुनीर यांच्या संवाद सुरु होता.
याच दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला. जर पाकिस्ताने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पायलट यांच्या जिवितास धोका पोहचेल असं काही कृत्य केलं तर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करेल अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली आहे अशी माहिती डोवाल यांनी अमेरिकेला दिली. हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालानुसार 27 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तानवर मिसाईल हल्ला करण्याच्या तयारीत होतं.
भारताच्या या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयात हडकंप माजला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैदेत ठेऊन काही फायदा नसल्याने अभिनंदन यांना भारताला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. 27 फेब्रुवारी रोजीच पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 28 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या संसदेत अभिनंदन वर्धमान यांना दोन्ही देशात शांतता राहावी म्हणून सोडत असल्याचं जाहीर केलं..त्यानंतर 1 मार्च रोजी अभिनंदन वर्धमान वाघा बोर्डरमार्गे पुन्हा भारतात परतले.
17 मार्च रोजी रॉयटर या संस्थेनेही भारत पाकिस्तानवरुद्ध मिसाईल युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं. 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाकिस्तानवर 9 मिसाईल हल्ला करण्यासाठी भारत सज्ज होतं. तर पाकिस्तानकडूनही भारतावर मिसाईल हल्ला करण्यात येणार होता अशी माहिती पाकिस्तानच्या सूत्रांनी दिली होती असं रॉयटरच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं.
(विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?)