भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 02:12 PM2019-04-10T14:12:00+5:302019-04-10T14:13:33+5:30
भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय
नवी दिल्ली - भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय. भारताच्या तुलनेत जागतिक दरात लोकसंख्येत 1.1 टक्क्यांनी वाढ होते. लोकसंख्या वाढीची टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचं दिसून आलं. 2010-19 या कालावधीत चीनची लोकसंख्या प्रत्येकी वर्षी 0.5 टक्क्यांनी वाढत आहे. संयुक्त राष्ट्र जनसंख्येचा स्टेट ऑफ वर्ल़्ड पॉप्युलेशन 2018 रिपोर्ट बुधवारी जाहीर करण्यात आला.
जागतिक लोकसंख्येचा आकडा 2019 मध्ये 771.5 करोडपर्यंत वाढला आहे. मागील वर्षी हाच आकडा 763.3 करोड होता. तर सरासरी 72 वर्ष माणसाचं आयुष्य दर आहे. अल्प विकसित देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येते. आफ्रीका खंडातील देशांमध्ये प्रत्येक वर्षी 2.7 टक्क्यांनी लोकसंख्या वाढत आहे. यूएनएफपीए या संस्थेची स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली. लोकसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने जगातील देशांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये आफ्रिकी देश आणि भारत, नायजेरियासारख्या देशांचा समावेश असणार आहे. भारताच्या 24 राज्यांमध्ये प्रति महिला 2.1 प्रजनन दर आहे. मात्र भविष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते.
भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय आहे. युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था यासाठी भारताने सज्ज राहायला हवं. कारण वाढत्या लोकसंख्येसोबत या समस्यांना भारताला तोंड द्यावं लागेल असा इशारा यूनएनएफपीए इंडियाचे अधिकारी चार्ज क्लॉस बैक यांनी दिला आहे.
लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला इतर देशांकडून शिकावं लागेल. सर्वात गरिब 20 टक्के घरांमध्ये गर्भनिरोधक आणि आरोग्य सेवांची गरजेची आहे. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. भारताने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे निवारा, अन्नाचा तुटवडा, मुलभूत सुविधांचा अभाव अशी अनेक संकटे भारतासमोर भविष्यात उभी राहतील.