प्रसारमाध्यमे स्वातंत्र्यात भारताचे स्थान घसरले; 'या' देशाला मिळाला सर्वांत शेवटचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:23 AM2023-05-05T09:23:33+5:302023-05-05T09:23:45+5:30
ताजिकिस्तान (१५३), तुर्कस्थान (१६५) या देशांतील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबतची स्थिती चिंताजनक आहे
नवी दिल्ली : यावर्षीच्या जागतिक प्रसारमाध्यमे स्वातंत्र्य क्रमवारीत भारताची ११ क्रमांकांनी घसरण झाली आहे. त्याबद्दल देशातील प्रसारमाध्यमविषयक संघटनांनी चिंता व्यक्त केली. यावर्षी भारताला क्रमवारीत १६१ वे स्थान मिळाले. उत्तर कोरियाला सर्वात शेवटचा म्हणजे १८० वा क्रमांक मिळाला आहे.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर (आरएसएफ) या संघटनेच्यावतीने दरवर्षी ही क्रमवारी तयार करण्यात येते. प्रत्येक देशात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य कसे जपले जाते, यावर या संघटनेचे बारीक लक्ष असते. त्यासाठी १८० देशांतील स्थितीचा विचार करण्यात येतो. गेल्यावर्षी या क्रमवारीत भारत १५० व्या क्रमांकावर होता.
ताजिकिस्तान (१५३), तुर्कस्थान (१६५) या देशांतील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबतची स्थिती चिंताजनक आहे. यंदाच्या क्रमवारीत भारताची घसरण झाल्याबद्दल दी इंडियन वूमन प्रेस कॉर्प्स, प्रेस क्लब ऑफ इंडिया, दी प्रेस असोसिएशन यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे चिंता व्यक्त केली आहे.
स्वत:ला कमी लेखू नका...
भारतासह काही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबत स्थिती आणखी बिघडली आहे. जागतिक स्तरावर विकसनशील देशांमध्ये अजूनही अनेक क्षेत्रांत विषमता आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रसारमाध्यमे बजावत असलेल्या भूमिकेला कोणीही कमी लेखू नये, असे या पत्रकात म्हटले आहे.