पाकिस्तानी सीमेजवळ भारताचे शक्ती प्रदर्शन, हायवेवर उतरले लढाऊ विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:27 PM2021-09-09T13:27:43+5:302021-09-09T13:28:10+5:30
Indian Air Force: पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि जग्वार सारख्या लढाऊ विमानांनी आपली ताकद दाखवली.
बाडमेर: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी राजस्थानच्या बाडमेरच्या गंधव-बखसर विभागात राष्ट्रीय महामार्ग-925 वर तयार केलेल्या 'आपत्कालीन लँडिंग फील्ड (ईएलएफ)' चे उद्घाटन केले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेजवळ शक्ती प्रदर्शन करत चक्क महामार्गावरच लढाऊ विमानं उतरवली. भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि जग्वारसारख्या विमानांनी पाक सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर आपली ताकत दाखवली.
हायवेवर उतरले राजनाथ सिंह-नितीन गडकरींचे विमान
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय हवाई दलाच्या एका विशेष विमानाने येथे आले होते. या विमानाचे लँडिंग याच हवाई पट्टीवर करण्यात आले. NH-925 हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे, जो हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी तयार करण्यात आलाय.
#WATCH | For the first time, a Sukhoi Su-30 MKI fighter aircraft lands at the national highway in Jalore, Rajasthan pic.twitter.com/BVVOtCpT0H
— ANI (@ANI) September 9, 2021
19 महिन्यांत 3 किमी हवाई पट्टीचे बांधकाम
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी NH-925A च्या सट्टा-गंधव विभागाच्या तीन किलोमीटरच्या पट्टीवर ही आपत्कालीन पट्टी बांधली आहे. ईएलएफचे बांधकाम 19 महिन्यांत पूर्ण झाले. जुलै 2019 मध्ये सुरू झालेले बांधकाम जानेवारी 2021 मध्ये तयार झाले. आयएएफ आणि एनएचएआयच्या देखरेखीखाली 'जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ने ही हवाई पट्टी बांधली आहे.
तीन हेलिपॅड देखील बांधण्यात आले
या प्रकल्पा अंतर्गत कुंदनपुरा, सिंघानिया आणि बखसर गावांमध्ये हवाई दल/भारतीय सैन्याच्या गरजेनुसार तीन हेलिपॅड (प्रत्येक आकार 100 x 30 मीटर) बांधण्यात आले आहेत. हे भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलाचे वेस्टर्न इंटरनॅशनल नेटवर्क मजबूत करण्यासाठी काम करतील.