अवकाशानंतर समुद्राच्या खोलाशी जाण्याची भारताची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 05:12 PM2017-08-05T17:12:11+5:302017-08-07T10:23:03+5:30
अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत.
चेन्नई, दि.5- अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. माणसांना अवकाशात घेऊन जाणार GSLV-Mk3 हे यान लॉन्च करण्याची तयारी सुरू असताना भारत आता माणसांना खोल समुद्रात घेऊन जाण्यास सज्ज होतो आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
ईएसएसओ-नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या शास्त्रज्ञांची एक टीम समुद्रातील खोल पाण्यात जाण्याचं एक वाहन तयार करते आहे. या वाहनाचं प्राथमिक डिझाइन तयार असून या वाहनामधून तीन जण समुद्रात खोलपर्यंत जाऊ शकतात. हे वाहन पुढील पाच वर्षात तयार होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. समुद्राच्या खोल पाण्यात जाणार हे वाहन बनवायला जवळपास 500 करोडचा खर्च अपेक्षित आहे. या गाडीच्या मदतीने शास्त्रज्ञ समुद्रात सहा किलोमीटरपेक्षा जास्त खोल जाऊ शकणार आहेत. यातून खोल समुद्रात असणाऱ्या दुर्मिळ धातू आणि जीव-जंतूंबद्दल माहिती मिळविली जाणार आहे.
समुद्रात खोलवर जाणारं हे वाहन तयार झाल्यानंतर भारताची गणना अशा ठराविक देशांमध्ये केली जाइल, ज्या देशांनी समुद्रातील खोल पाण्यात माणसांना पाठविण्याची प्रणाली विकसीत केली आहे. सध्या चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जापान या देशांनी खोल समुद्रात लोकांना पाठविण्याची किमया साधली आहे. या वाहनासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्राकडून तो मंजूर होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. केंद्राकडून मंजूरी मिळतात शास्त्रज्ञांची एक टीम या डिझाइनचं मुल्यांकन करून त्यांला अजून चांगलं बनवेल, असं एनआयओटीचे डायरेक्टर सतीश शेनोई यांनी सांगितलं आहे. या टीममध्ये इस्त्रो, डीआरडीओ आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असेल.
सध्या जे डिझाइन तयार आहे त्यानुसार,या वाहनला एका जहाजातून समुद्राच्या आता नेऊन उतरवलं जाइल. या वाहनातून आत गेलेल्या व्यक्ती पाण्याच्या आतमध्ये आठ ते दहा तास काम करू शकतील. तसंच समुद्राच्या तळासी असलेली सामुग्री गोळा करू शकणार आहेत. तसंच वाहनाला असलेल्या काचेच्या खिडकीमुळे शास्त्रज्ञांना समुद्रातील आतल्या बाजूंची योग्य माहिती मिळविणं शक्य होणार आहे. दरम्यान, हे मोठं ध्येय गाठण्याच्या आधी शास्त्रज्ञ या वाहनाशी मिळताजुळतं एक समुद्री यान पुढील तीन वर्षात बनविण्याची योजना आखत आहेत. जे वाहन लोकांना हिंद महासागरात 500 मीटरपर्यंत आत घेऊन जाऊ शकेल. शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसंच मोठ्या मोहीमेसाठी काही प्रमाणात अनुभव मिळावा, यासाठी हा छोटा प्रकल्प राबविला जाणार आहे.