भारतात पुन्हा हल्ल्याचा हाफिज सईदचा कट
By admin | Published: November 8, 2016 03:07 AM2016-11-08T03:07:59+5:302016-11-08T03:07:59+5:30
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे
नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे. हाफिज सईद आपल्या दहशतवाद्यांना जल मार्गाने भारतात घुसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
लष्कर-ए-तोयबाचे ८ ते ९ दहशतवादी जम्मूमधील निक्की तावी आणि बडी तावी या नद्यांचा मार्गाने भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्य त्यांना मदत करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानमधील चेनाब नदी जम्मू भागात तावी नदीला मिळते. त्यामुळे आधी जम्मूमध्ये घुसून, भारतात हल्ले करण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे.
हाफिज सईदने या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू इरफान टांडेवालावर सोपवली आहे. हाफिजच्या या योजनेची माहिती मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मूच्या निक्की तावी आणि बडी तावी नद्यांच्या आसपासच्या परिसरात तसेच त्या संपूर्ण भागात कडक बंदोबस्त ठेवला आहे.
तेथील सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. सीमेवरून घुसण्यात अडचणी येत असल्याने आणि ते करताना अनेक अतिरेकी मारले जात असल्याने हाफिज सईदने या मार्गाने दहशतवादी पाठवण्याचे ठरविले असावे, असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने
गोळीबार करून, त्या काळात अतिरेकी भारतात घुसविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आतापर्यंत यश आलेले नाही. (वृत्तसंस्था)