पाकिस्तानी हॅकर्सला भारतीयांचं जशास तसं उत्तर, पोलिसांची वेबसाइट हॅक करुन लिहिलं 'वंदे मातरम'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 03:33 PM2017-12-23T15:33:25+5:302017-12-23T15:34:25+5:30
एका भारतीय हॅकर ग्रुपने शुक्रवारी कराची पोलिसांची वेबसाइट हॅक केली. हॅकर्स फक्त वेबसाइट हॅक करुन थांबले नाहीत, तर त्यांनी साइटवर 'वंदे मातरम' असं लिहिलं.
नवी दिल्ली - एका भारतीय हॅकर ग्रुपने शुक्रवारी कराची पोलिसांची वेबसाइट हॅक केली. हॅकर्स फक्त वेबसाइट हॅक करुन थांबले नाहीत, तर त्यांनी साइटवर 'वंदे मातरम' असं लिहिलं. महत्वाचं म्हणजे जितका वेळ वेबसाइट हॅक होती, तितका वेळ तिथे भारताचं राष्ट्रीय गीत वाजत होतं. कराची पोलिसांना वेबसाइट हॅक झाली आहे, हे कळायला वेळ लागला. पण नंतर त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली. अथक प्रयत्नानंतर वेबसाइट पुर्ववत करण्यात त्यांना यश मिळालं. गतवर्षी काही पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या वेबसाइट्स हॅक केल्या होत्या. या वेबसाइट्सवर त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची गाणी वाजवली गेली होती. भारतीय हँकर्सनी कराची पोलिसांची वेबसाइट हॅक करुन त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. कराची पोलिसांची वेबसाइट हॅक करणा-यांनी आपण ‘मल्लू साइबर सोल्जर्स’ असल्याचा दावा केला आहे. वेबसाइटवर त्यांनी वंदे मातरमसहित लिहिलं होतं, हॅक्ड बाय D3VIL S3C।.
इतकंच नाही हॅकर्सने पुढे लिहिलं होतं की, 'आम्ही भारतावर प्रेम करतो'. वेबसाइट जितका वेळ हॅक होती, तितका वेळ त्याच्यावर भारताचं राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' सुरु होतं. 1998 पासून सीमारेषेपलीकडून हॅकिंग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. जून महिन्यात भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानमधील पीपीपी नावाची एक वेबसाइट हॅक केली होती.
इतकंच नाही तर भारतातील काही हॅकर्सनी गतवर्षी दोन वेळा लाहोर उच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक केली होती. त्याआधी पाकिस्तानच्या हॅकर्सनी रायपूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची वेबसाइट हॅक केली होती. हॅकर्सनी आपण पाकिस्तानचे असल्याचा दावा केला होता. त्यांनी गतवर्षी जुलै महिन्यात भारतातील सात दूतावास, उच्चायुक्त आणि वेगवेगळ्या देशांतील भारतीय दुतावासांची वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला होता.
पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक, तिरंग्यासह लिहिलं जन-गण-मन
ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक करण्यात आली होती. वेबसाइट हॅक करून हॅकर्सनं भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही अज्ञात हॅकर्सनं पाकिस्तानची सरकारी वेबसाइट हॅक करत त्यावर भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवसांच्या शुभेच्छांसह भारताचं राष्ट्रगीत पोस्ट केलं होतं.