प्रदूषण नियंत्रणातील भारताची जबाबदारी वाढली
By admin | Published: April 26, 2017 01:00 AM2017-04-26T01:00:10+5:302017-04-26T01:00:10+5:30
जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो
नवी दिल्ली : जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो; परंतु प्रदूषण कमी न होता वाढत जात आहे. जलवायू प्रदूषणामुळे तर हे संकट आणखी भयावह होत आहे. परिस्थिती अशी बनली आहे की, स्वत:ला वाचवण्याच्या संघर्षाचे नावच वसुंधरा दिन झाले आहे. आम्ही आताच जागे झालो नाही, तर येणारा काळ सर्वनाशाचा असेल व त्याला फक्त आम्हीच जबाबदार असू. आज जगाचे सरासरी तापमान १.५ अंशाने वाढले आहे. दिल्लीतील एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही जास्त झाले आहे. वाढती औद्योगिक उत्पादने, कोणतेही बंधन नसलेली विकास कामे, इंधन व गॅसच्या वाढत्या वापरामुळे भारत कार्बन उत्सर्जनात जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हिमालय आणि हिमनद्या वितळत असल्यामुळे नैसर्गिक दुर्घटनांत वाढ होण्याची भीती आहे. कार्बन उत्सर्जनात अमेरिका पहिल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. भारतात वाहनांची संख्या व कार्बन उत्सर्जनाचा वेग पाहता भारत अमेरिका व चीनच्या स्पर्धेत येऊ शकतो. पर्यावरण असंतुलनामुळे जलवायू परिवर्तन तर होतच आहे, शिवाय कृषी उत्पादन आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे.
भारतात २५ वर्षांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी वेग घेतला आहे त्याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. भारताने दोन आॅक्टोबर २०१६ रोजी जलवायू परिवर्तन करारावर स्वाक्षरी केली त्यामुळे त्याची जबाबदारी आता खूप वाढली आहे.