कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:20 AM2024-06-27T09:20:51+5:302024-06-27T09:21:51+5:30
पहिलाच दिवस गाजला ‘आणीबाणी’च्या उल्लेखाने.
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बलराम जाखड यांच्यानंतर ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांची ‘इंडिया आघाडी’चे के. सुरेश यांच्याशी लढत होती; मात्र आवाजी मतदानाने निर्णय बिर्ला यांच्या बाजूने लागला. संख्याबळाचा अभाव पाहता काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मतदानाची मागणीही केली नाही. कालपर्यंत या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आग्रही होती. त्यासाठी तयारीही केली. कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सर्वांत मोठी पहिली लढत होणार होती. पण, इंडिया आघाडीकडे संख्याबळ नसल्याचे दिसताच निवडणूक टळली. बिर्ला अध्यक्ष होताच त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणीचा उल्लेख केला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला.
लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना सन्मानाने त्यांच्या आसनावर विराजमान केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरले.
तृणमूल राहिली दूर
ओम बिर्ला यांच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीने के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती; परंतु तृणमूल काँग्रेसने आधीच मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, इंडिया आघाडी व काँग्रेस नेत्यांनी उमेदवार उभे करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चाही केली नाही.
‘इंडिया आघाडी’चे संख्याबळ १९७
इंडिया आघाडीच्या ७ खासदारांनी खासदार म्हणून शपथही घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानात भाग घेता आला नसता. इंडिया आघाडीच्या खासदारांची एकूण संख्या २३३ आहे, त्यापैकी २९ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या १९७ राहिली.
‘एनडीए’चे संख्याबळ ३०७
जगन मोहन रेड्डी यांच्या चार खासदारांच्या पाठिंब्याने आणि १० अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याने सत्ताधारी पक्षाच्या ‘एनडीए’च्या खासदारांची संख्या २९३ होती, तर ओम बिर्ला यांच्या बाजूने असलेली संख्या ३०७ होती. जर इंडिया आघाडीने मतदानाची मागणी केली असती तर निकाल ३०७ विरुद्ध १९७ असा लागला असता.